कार चोरटा १० तासात पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: February 2, 2016 12:28 AM2016-02-02T00:28:42+5:302016-02-02T00:28:42+5:30
जिल्हा परिषद कॉलनी येथील अभय थुंबे यांच्या घरासमोरून चोरी गेलेली कार पोलिसांनी १० तासांमध्ये पकडून चोरट्याला जाळ्यात अडकविले.
भंडारा पोलिसांची कारवाई : शहरातीलच चोरट्याकडून कार हस्तगत
भंडारा : जिल्हा परिषद कॉलनी येथील अभय थुंबे यांच्या घरासमोरून चोरी गेलेली कार पोलिसांनी १० तासांमध्ये पकडून चोरट्याला जाळ्यात अडकविले.
रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषद कॉलनी येथील घरासमोर चारचाकी एम.एच. ३६ एच ६३२५ ठेवली असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. अभय थुंबे यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर भंडारा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. येथील डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभय थुंबे यांची विचारपूस करून चोरट्याच्या शोधार्थ निघाली होती. दरम्यान विद्यानगर येथील चोरट्याकडे ती कार आढळून आली. चोरट्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा तासात त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे, संदीपान उबाळे, हवालदार पुरुषोत्तम शेंडे, प्रशांत गुरव, दिनेश गलुले, रमेश बेदरकर, विजय तायडे यांनी पार पाडली.
कार चोरीचा तपास जसा वेगाने लागला तसा तपास दुचाकी व घरफोडी घटनाचा व्हायला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)