पुरात वाहून गेली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 10:16 PM2019-09-02T22:16:15+5:302019-09-02T22:16:51+5:30
साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले. साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/साकोली : जिल्ह्यात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर वरूण राजाने पुन्हा दमदार हजेरी लावली.साकोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. उसगाव, मक्कीटोला येथील नाल्यावरील पुलाजवळ चक्क एक कार पूराच्या पाण्यात वाहून गेली. नागरिकांनी वेळीच दखल घेवून कारमधील दोघांना वाचविले.
साकोली तालुक्यात सोमवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली.
शहरासह ग्रामीण क्षेत्रात बरसलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांनाही पूर आला. उसगाव-मक्कीटोला येथे असलेल्या नाल्याच्या पुलाजवळून कार जात असताना पाण्याच्या प्रवाहात कार वाहून गेली. नागरिकांच्या सहकार्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. देवचंद चांदेवार व मुनेश्वर करंजेकर दोन्ही रा. साकोली अशी बचावलेल्या इसमांची नावे आहेत. चांदेवार हे साकोलीहून चांदोरीकडे जात असताना ही घटना घडली.
पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याच्या प्रयत्न करण्यात आला. समयसुचकता दाखवित चांदेवार यांनी कारमधून उडी घेतली व जवळच असलेल्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी करंजेकर हे कारसोबत वाहून गेले. घटनास्थळावर एकच गर्दी झाली. गावकऱ्यांनी धावपळ करून दोराच्या सहायाने कार व करंजेकर यांना पाण्याबाहेर काढले.
जिल्ह्यात सर्वत्र पाऊस
गत २४ तासात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात एकूण सरासरी ६.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात ३.३ मि.मी., मोहाडी ४.२, तुमसर २० मि.मी., साकोली १०.२ मि.मी. तर पवनी तालुक्यातही पाऊस बरसल्याची माहिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८६ टक्के पाऊस बरसला आहे. यादरम्यान वेधशाळेने अजून दोन दिवस पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.