करडी आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:04 AM2018-08-21T01:04:00+5:302018-08-21T01:04:46+5:30
वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुक्यापासून वेगळे असलेल्या झाडीपट्टी परिसरातील ४५ हजार लोकसंख्येसाठी करडी येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर केंद्राची इमारत ३४ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुक्यापासून वेगळे असलेल्या झाडीपट्टी परिसरातील ४५ हजार लोकसंख्येसाठी करडी येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर केंद्राची इमारत ३४ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. स्लॅबला तडे गेल्याने पाणी झिरपत असते. सळाखी बाहेर पडल्या आहेत. वसाहतींची स्थिती सुद्धा दयनीय असल्याने कर्मचारी घाबरत आहेत.
१६ वर्ष जुनी रुग्णवाहिका भंगारात निघाली तर कर्मचाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींना प्रकरणी माहिती देण्यात आली असून त्वरीत कार्यवाहीची गरज आहे.
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम सन १९८५ मध्ये करण्यात आले. आज त्या इमारतीला ३४ वर्ष होत आहेत. बांधकामाचा दर्जा निम्न प्रकारचा असल्याने आज इमारतीचे खस्ताहाल झाले आहेत. इमारतींच्या भिंतीला भेगा पडल्या असून स्लॅब पावसाळ्यात गळतो आहे. स्लॅबचे पोपडे निघत असल्याने एखादवेळेस रुग्ण किंवा कर्मचाऱ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. मोहाडी तालुक्यातील सर्वात मोठी ओपीडी असल्याने येथे रुग्णांची संख्या अधिक असते. पावसाळ्यात रोज २५० ते ३०० रुग्ण उपचार २कण्यासाठी येथे पोहचतात. परिसरात एकमेव शासकीय सुविधा असल्याने व शहरांचे अंतर ३५ ते ४० कि.मी. पर्यंतचे असल्याने आर्थिक खर्च सहन होणार नाही.
रुग्णांना शहरातील दवाखान्यात रेफर करण्यासाठी तसेच कुटुंब कल्याण व अत्यावश्यक रुग्णांना घरी व घरून प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका विभागाचे वतीने देण्यात आली. आत तिला १६ वर्ष झाली आहेत. त्यामुळे तिचे बेहाल झाले आहेत. वारंवार बिघडत असल्याने वाहनाचा खर्च आता झेपणारा नाही. त्यामुळे नवी रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला मिळणे आवश्यक झाले आहे. करडी प्राथमिक आरोग्य केंद्र व केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची ८ पदे रिक्त आहेत. यात २ वैद्यकीय अधिकाऱ्यांची महत्वाची पदे रिकामी आहेत. सहा महिन्यांसाठी येणाºया तात्पुरत्या शिकावू डॉक्टरांच्या भरवशावर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु आहे. २ जीएनएम, १ एएनएम, ३ परिचरांचे पद रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांना आवश्यक तेवढ्या सेवा पुरविण्यास कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
करडी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ३४ वर्ष जुनी असून धोकादायक स्थितीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना सुद्धा भेगा पडल्या आहेत. स्लॅब पाझरत असल्याने व ठिकठिकाणी तडे गेल् याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णवाहिका भंगारात निघालेली तर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रकरणी जि.प. मध्ये प्रश्न लावून धरला. जिल्हा आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
-निलीमा इलमे, जि.प. सदस्या, करडी.
जिल्हा आरोग्य विभागाचे करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दूरवस्थेकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पडक्या स्थितीतील केंद्राची इमारत व वसाहत तसेच रुग्णवाहिका आणि डॉक्टर, कर्मचाºयांचे प्रश्न यासंबंधी पालकमंत्री, आमदार, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. सदस्य यांचेकडे निवेदन देण्यात आले असून पाठपुरावा सुरु आहे.
-निशिकांत इलमे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भंडारा.