जिल्ह्याच्या विकासाचे सुक्ष्म नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:08+5:302021-02-05T08:38:08+5:30
सोकाली : धानाला योग्य भाव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही कटिबद्ध आहोत. ...
सोकाली : धानाला योग्य भाव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही कटिबद्ध आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळात गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आपण करत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथील श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. गत पाच वर्षांत भाजपप्रणित सरकारने विकासाच्या दृष्टीने काहीच केले नाही, हे सर्वांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थाने भंडारा जिल्ह्याचा विकास गत पाच वर्षांत खुंटला आहे. सिंचन प्रकल्प तसेच पडून आहेत, शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळाले नव्हते. या बाबींचाही आता सर्वसामान्यांपर्यंत उलगडा करण्याची गरज आहे. कोरोना आपत्तीच्या काळातही गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रखडलेला पैसा देण्यात आला, केंद्र सरकारच्या शेतकरी व सर्वसामान्यांच्या विरोधी भूमिकेचेदेखील पितळ उघडे पडले आहे. मागील दोन महिन्यांपासून लाखाेंच्या संख्येत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, या आंदाेलनाची दखल घेतली जात नाही, असे पटेल म्हणाले.
यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जिल्हा बँकचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रशांत पवार, अतुल परशुरामकर, जया भूरे, अंगराज समरीत, प्रभाकर सपाटे, रामचंद्र कोहळे, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, डाॅ. अनिल शेंडे, प्रदीप मासुरकर, सुरेश पंधरे, लता द्रुगकर, रेणुका कोहळे, सुषमा समरीत, माया दिघोरे उपस्थित होत्या.