गोशाळेतील गुरांची विक्री; चार पशुवैद्यकांसह १७ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 11:08 AM2022-10-26T11:08:48+5:302022-10-26T11:11:18+5:30
जनावरे मृत भासवून लावली विल्हेवाट
पवनी (भंडारा) : गोशाळेत दाखल जनावरांची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी चार पशुवैद्यकांसह १७ जणांवर पवनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात गोशाळेचे संचालक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
विसर्जन सज्जन चौसरे, विपीन शरद तलमले, मिलिंद रामदास बोरकर, दत्तू शंकर मुनरत्तीवार, माया विसर्जन चौसरे, महेश दौलत मसराम, युवराज रवींद्र करकाडे, लता दौलत मसराम, शिवशंकर भाष्कर मेश्राम सर्व रा. पवनी, खुशाल दिलीप मुंडले रा. बेटाळा, विलास वेदूनाथ तिघरे, वर्षा लालचंद वैद्य, नाना मोतीराम पाटील रा. सिरसाळा, तर पशुवैद्यक डॉ. दिनेश चव्हाण रा. पवनी, डॉ. सुधाकर महादेव खुणे रा. कन्हळगाव, ता. अर्जुनी मोरगाव, डॉ. हेमंतकुमार गभने, रा. अड्याळ, डॉ. तुळशीदास शहारे रा. खात रोड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
बनावट मृत्यू प्रमाणपत्र
पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे बळीराम गोमाता सेवाभावी संस्था आहे. चंद्रपूर येथील ८९ जनावरे या गोशाळेत दाखल करण्यात आली. ही जनावरे मृत झाल्याचे भासवून त्यांची विक्री केली. पशुवैद्यकांच्या मदतीने बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पवनी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावरून १७ जणांवर भादंविच्या ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.