रानडुकरांची शिकार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:49 PM2021-05-22T12:49:20+5:302021-05-22T12:49:49+5:30
मोगरा येथे धाड : लाखनी वनविभागाची कारवाई
लाखनी (भंडारा) : रानडुकराची शिकार करुन मांसाची विक्री करणाऱ्या तीन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. लाखनी तालुक्याच्या मोगरा येथे शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
नितेश राम रतन मेश्राम (३५) रा. मुरमाडी (तुपकर), मार्तंड तिमा मेश्राम (६०) रा. मोगरा, अश्विन दाजीबा देशमुख (३५) रा. मुरमाडी (तुपकर) अशी शिकाऱ्यांची नावे आहेत. लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपुरी बीटमधील मोगरा येथे दोन रानडुकरांची शिकार करून मांस विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. त्यावरुन धाड मारली असता या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तरी, काहीजण पसार झाले. आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपवनसंरक्षक एस.बी. भलावी, सहाय्यक वनसंरक्षक आर. पी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी ए. जी. मेश्राम, क्षेत्रसहाय्यक डी. के. राऊत यांनी कारवाई केली.