कॅशलेस व्यवहारासाठी प्रशिक्षण
By admin | Published: January 5, 2017 12:37 AM2017-01-05T00:37:06+5:302017-01-05T00:37:06+5:30
८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी ...
अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा : ग्रामीण भागातही कार्यशाळेचे आयोजन
भंडारा : ८ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेश व्यवहार अवगत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. मंगळवारला सामाजिक न्याय भवन येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करुन रोखरहित व्यवहाराची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत रोखरहित व्यवहार कसे करावे ही बाब सादरीकरणाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आली.
आपले सरकार सेवा केंद्राच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने डिजीटल पेमेंट, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट आॅफ सेल मशीन, ई-बटवा व आधारकार्ड एनेबल पेमेंट याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पेमेंट आता कॅशलेश पध्दतीने करण्याचा शासनाचा आदेश आहे. या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांना रोखरहित व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने या कार्यशाळा अयोजित करण्यात येत आहेत.
कॅशलेश होतांना नागरिक आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पाच सोप्या पध्दतीने करु शकतात. यासाठी आपला मोबाईल आपला बटवा होणार आहे. यात युपीआय युएसएसडी पध्दती, ई-वॉलेट, बँक कार्डस व पॉर्इंट आॅफ सेल मशिन आणि आधार एनेबल पेमेंट पध्दतीचा समावेश आहे. या सर्व पध्दती या कार्यशाळेत सादरीकरणासह समजावून सांगण्यात आल्या. कॅशलेश महाराष्ट्रासाठी व नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील गावागावात असे प्रशिक्षण देण्याचा जिल्हाधिकारी यांचा मानस आहे.
या कार्यशाळेत आपले सरकार सेवा केंद्राचे प्रशिक्षक हरिचंद्र पौनीकर व नंदकिशोर उरकुडे यांनी साध्या व सोप्या भाषेत सादरीकरणाद्वारे कॅशलेश व्यवहाराच्या पाचही मुद्दयांची माहिती दिली. पहिल्या तीन मुद्दयाबाबत म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस(वढक), ई-वॉलेट, कार्ड्स, पीओएस, स्मार्ट मोबाईल व इंटरनेट सुविधा आवश्यक असून उर्वरित दोन मुद्दयाबाबत म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सिस्टीम(अएढर), अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी) स्मार्ट मोबाईल व इंटरनेटची आवश्यकता नसल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.
या वेळी प्रशिक्षकांनी सांगितले की, कार्यशाळेत असलेल्या प्रत्येकांनी ही माहिती आपल्या परिवारास, मित्रास तसेच इतरांना द्यावी व कॅशलेश व्यवहाराविषयी जनजागृती करावी.
कार्यशाळा संपल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक आत्मविश्वास वाटत होता की आपणास कॅशलेश व्यवहाराची माहिती फार महत्वाची आहे आणि ती मी इतरांना सांगणार. या कार्यशाळेत अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)