बहाव्याला आला बहर; यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 01:43 PM2021-04-29T13:43:43+5:302021-04-29T13:44:06+5:30
Bhandara news Cassia fistula यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळत आहेत.
सुखदेव गोंदोळे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. हा १०० टक्के भारतीय कुळातील असून भारताच्या विविध भागात आढळते पिवळ्या धमक फुलांच्या पाकळ्यांनी भरलेले बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच.
मराठीत 'बहावा ' तर शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिस्टुला’ हे नाव त्याच्या शेंगेवरून पडले. फिस्टुला म्हणजे पोकळ नळी. या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतला गाभूळलेल्या चिंचेसारखा गर माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी सम संख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. बहुगुणी बाहवा एक वनौषधी म्हणून उपयोगात आणला जातो. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'गोल्डन शोवर ट्री' म्हणून ओळखला जातो.
पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती ; परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकऱ्याला पावसाचा अंदाज घेता येत असे. निसर्गातील प्रत्येक झाडाचा फुले, फळे येण्याचा एक विशिष्ट काळ आहे. काही झाडे, वनस्पतींचे काही गुण आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठय़ा प्रमाणात बहार आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळत आहेत.
सध्या वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी येणार, हे सांगणारी यंत्रणा, हवामानशास्त्र प्रगत असले, तरी ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी बांधव हे अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार, याचा अंदाज घेतात. निसर्ग पावसाच्या आगमनाची चाहूल देतो. अनेक वनस्पती या नैसर्गिक बदलाचे संकेत, संदेश देतात.
बहावा ही आकर्षक पिवळ्य़ा रंगाची फुले येणारी वनस्पती आहे. बहावा फुलण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. एप्रिल महिन्यात बहावा ही वनस्पती पूर्णतः फुलून येते ; परंतु यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस होण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत. निसर्गामध्ये अनेक वनस्पती, झाडे आहेत. त्यांच्या बहरण्यावरून पावसाचा अंदाज काढता येतो.
मोहफुले बहरण्यावरून आदिवासी बांधव पावसाचा अंदाज काढतात. त्याचप्रमाणे बहावा या झाडाला किती फुले, यावरून यावर्षी किती प्रमाणात पाऊस पडणार किंवा पावसाळा कसा राहील, याचा अंदाज काढल्या जातो. पावसाचे संकेत अनेक पक्षी सुद्धा देतात. काही पक्षी त्यांची घरटी झाडाच्या वरच्या टोकाला साकारत असतील, तर यावरून निश्चितपणे पाऊस भरपूर येण्याचा अंदाज काढला जातो. मोहा बहरल्यावर आदिवासी बांधव ही फुले एक पानांची परडी तयार करून ते नदी, तलावामध्ये सोडतात. परडी किती दूर गेली, यावरूनही पावसाचा अंदाज ठरवितात.
‘निसर्गातील प्राणी, पक्षी, वनस्पती इत्यादी आपल्याला वेळोवेळी संकेत, संदेश देत असतात ; परंतु त्याला वैज्ञानिक आधार नसला, तरी एक प्रचलित मान्यता आहे. यंदा बहावा ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात बहरली आहे. त्यांच्या फुलांच्या बहरावरून यंदा पाऊस वेळेवर व चांगला होण्याचे संदेश मिळतात’
- विकास बावनकुळे, निसर्गप्रेमी