सिहोरा परिसरातील गुरांचा बाजार लॉकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:17+5:302021-06-25T04:25:17+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर अंकुश ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर अंकुश घालण्यात यश आले आहे. या संसर्गाच्या मृत्युदरात घट झाली आहे. याच कालावधीत शासनाने मोठ्या उपाययोजना केल्या आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने शासन गंभीरतेने उपाययोजना करीत आहे. याशिवाय लसीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. भयमुक्तपणे ग्रामीण भागात नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. दरम्यान, शासनाने टप्प्याटप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबविण्यात सुरुवात केली आहे. किराणा व्यावसायिकांच्या दुकानाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. नियमांचे पालन करीत व्यावसायिकांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या आठवडी बाजार व गुरांचा बाजार सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली नाही. सिहोरा परिसरातील एकही आठवडी बाजार आणि गुरांचा बाजार सुरू झालेला नाही. बैल बाजार सुरू झाले नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. याच बाजारात जनावरे खरेदी-विक्री केली जात आहे. शेतीचा हंगाम असल्याने शेतकरी बैल खरेदीसाठी बाजारात धाव घेत आहेत. परंतु बाजार सुरू नसल्याने शेतकऱ्यांची गावात लूट सुरू झाली आहे. गावात परस्पर जनावरे खरेदी-विक्री दलाल करीत आहेत. अनामत रक्कम वसूल करण्यात येत आहे. परंतु कुणी ऐकणारे नाहीत. खरिपाचे हंगामात बैल व मवेशी बाजार सुरू होण्याची अपेक्षा होती. परंतु जिल्हा प्रशासनाने याचा निर्णय घेतला नाही. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी संतापले आहेत.
कोट
परिसरातील अन्य गावांत आठवडी व गुरांचा बाजार सुरू करण्यात आले आहेत. परंतु सिहोरा परिसरातील बाजार लॉकच आहेत. शेतीचा हंगाम असल्याने मवेशी व बैलबाजार सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. कोरोना हद्दपार होत असल्याने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतले पाहिजे.
- प्रेमलाल पात्रे, कंत्राटदार, सिहोरा