भटक्यांच्या वस्तीत भाऊबीज साजरी

By admin | Published: November 2, 2016 12:43 AM2016-11-02T00:43:18+5:302016-11-02T00:43:18+5:30

समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा ...

Celebrate Bhoobeej in the rooftops | भटक्यांच्या वस्तीत भाऊबीज साजरी

भटक्यांच्या वस्तीत भाऊबीज साजरी

Next

फुंकर आपुलकीची : भेट देणारे आणि भेट घेणारेही भारावले
भंडारा : समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून भटके विमुक्त परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील भटक्यांच्या चार वस्त्यांमध्ये आज मंगळवारला भाऊबीज साजरी करण्यात आली. भटक्या समाजातील बांधवांना ओवाळून त्यांना भेटवस्तू देण्यात आले. झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मिळालेले प्रेम आणि आपुलकी पाहून भटके समाजबांधव भारावलेले दिसत होते.
आज एकीकडे प्रत्येक सणांचा स्वच्छंदपणे आनंद घेतला जात असताना आपल्या पैकीच असलेले मात्र भटके म्हणून ओळखले जाणारे समाजबांधव हा आनंद साजरा करू शकत नाही. अनेक अडीअडचणी आणि समस्यांसह जीवन जगत असलेल्या या भटक्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांनाही एक नागरिक म्हणून सर्व अधिकार मिळावे व सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी भटके विमुक्त परिषद धडपडत आहे.
हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण असलेल्या दिवाळी या सणाच्या निमित्ताने भटक्यांच्या वस्त्यांमध्ये आनंद पसरावा म्हणून आज मंगळवारला भटके विमुक्त परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्यावतीने भटक्यांच्या वस्तीत जाऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या कतारी समाजाच्या वस्तीत जाऊन भटक्या बांधवांना ओवाळण्यात आले व भेटवस्तू देण्यात आले. याचवेळी बिऱ्हाडातील महिलांनाही भेटवस्तू देण्यात आले. फराळ करून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी सुंदरलाल अंकूशे या भटक्या बांधवाने मनोगत व्यक्त करताना अशा उपक्रमांमुळे आम्ही समाजात सन्मानाने जगू शकत असल्याचे सांगितले. यामुळे आम्हाला आमचे हक्क व अधिकारी मिळू लागले असून शिक्षणापासून ते सर्वच क्षेत्रात पूढे येण्याची संधी मिळत असल्याचे सांगून असेच सोबत रहा, असा आग्रह त्यांनी केला.
यावेळी नगर संघचालक अनिल मेहर व व्यापारी सतराम कौराणी यांना भटक्या समाजातील महिलांनी ओवाळले. कतारी समाज बांधवांसोबत भाऊबीज साजरी केल्यानंतर कारधा येथील मांग, गारुडी लोकांसोबतही संध्याकाळी साजरा करण्यात आली.
लाखांदूर व लाखनी तालुक्यातील भटक्यांच्या वस्तीत जाऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. भटक्या बांधवांसाठी दिलेल्या भेटवस्तू समाजातील दानशूर मंडळींकडून घेण्यात आल्या होत्या.
यावेळी जिल्हा संघचालक राम चाचेरे, विहिंप जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, जिल्हा सहकार्यवाह रामकृष्ण बिसने, जिल्हा प्रचार प्रमुख राजेंद्र दोनाडकर, विभाग प्रचारक राहूल चव्हाण, सुखराम कटरे, जिल्हा प्रचारक प्रशांत कावरे, पंकज देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक शिवशंकर नाकाडे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन शिवा कांबळी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Celebrate Bhoobeej in the rooftops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.