गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:00 AM2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:36+5:30

जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचे झाल्यास मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी तहसीलदारांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आसून त्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आलेली आहे.

Celebrate Ganeshotsav simply | गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा

googlenewsNext
ठळक मुद्देएम. जे. प्रदीपचंद्रन : शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचनाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्याअनुषंगाने भंडारा जिल्ह्यात या वषार्चा गणेशोत्सव व इतर सण शक्यतो सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता साध्या पध्दतीने साजरे करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात नागरिकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ऐवजी घरच्या घरी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचे झाल्यास मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी तहसीलदारांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आसून त्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यात आलेली आहे.
श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती गणपती दोन फुटांच्या मर्यादेत असावी. शक्यतो एक गाव एक गणपती या संकल्पनेचा आधार घेण्यात यावा. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मुर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. जेणेकरून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटबियांचे कोरोना साथीपासून रक्षण होईल असे या आदेशात म्हटले आहे.
तसेच आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक लाईव्ह इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्य कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी. कंटेनमेन्ट झोनमधील व्यक्तींना तसेच क्वारन्टाईन असलेल्या व्यक्तिंना त्यांचे कालखंड पूर्ण होईपर्यंत भंडारा जिल्ह्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास प्रतिबंध राहील.
उक्त कालावधीत गणपती मंडळाला भेटी दिलेल्या व्यक्तींचे नाव ठिकाण, कार्यालयांची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवावी. जेणेकरुन यदाकदाचित संशयित रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोईचे होईल.
गणपती मंडपामध्ये निजंर्तुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी सामाजिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सीग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच दिवसातून तीन वेळा मंडप परिसराचे सॅनिटायझेशन करावे.
दहा लोकांच्या कमाल उपस्थितीत विसर्जनास परवानगी राहील. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करण्यात यावी. लहान मुले व वरिष्ठ नागरीकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाण्यास प्रतिबंध राहिल. नगरपरिषद, पंचायत व ग्रामपंचायत यांनी विसर्जनाकरीता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरिता पूर्णत: मनाई करण्यात येत आहे.
या कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे, हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी नव्याने दुकाने लावण्यास मनाई असेल. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शासनाचे नाहरकत प्रमाणपत्र गरजेचे
गणेशोत्सव जागेकरिता नाहरकत प्रमाणपत्र शहरी भागासाठी नगर परिषद, पंचायत व ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत कार्यालय प्रदान करतील.कोविड संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाचे आदेश तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असून घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. उत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. परंतु घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यास मनाई असेल. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य शिबीरे, रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

Web Title: Celebrate Ganeshotsav simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.