कृषी कायदे मागे घेतल्याचा धान पट्ट्यात आनंदाेत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 05:00 AM2021-11-20T05:00:00+5:302021-11-20T05:00:24+5:30
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी वर्षभरापासून शेतकरी आंदाेलन करीत हाेते. पंतप्रधानांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घाेषणा केली आणि भंडारा जिल्ह्यात जल्लाेष करण्यात आला. भंडारा तालुक्यातील पिपरी गावात ओबीसी क्रांती माेर्चाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धानाच्या पुंजण्यावर उभे राहून जल्लाेष केला. तसेच एकमेकांना जिलेबी वाटली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविराेधात शेतकऱ्यांचे आंदाेलन सुरू हाेते. या आंदाेलनामुळे शुक्रवारी पंतप्रधानानी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा आनंदाेत्सव धान पट्यात शेतकऱ्यांनी साजरा केला. भंडारा तालुक्यातील पिपरी येथे शेतकऱ्यांनी जल्लाेष करीत एकमेकांना जिलेबी वाटली. शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांनीही यावर समाधान व्यक्त केले.
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी वर्षभरापासून शेतकरी आंदाेलन करीत हाेते. पंतप्रधानांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घाेषणा केली आणि भंडारा जिल्ह्यात जल्लाेष करण्यात आला. भंडारा तालुक्यातील पिपरी गावात ओबीसी क्रांती माेर्चाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धानाच्या पुंजण्यावर उभे राहून जल्लाेष केला. तसेच एकमेकांना जिलेबी वाटली. यावेळी ओबीसी क्रांती माेर्चाचे संयाेजक संजय मते, संयाेजक जीवन भजनकर, जिल्हा सचिव भाऊ काताेरे, शालिक तितीरमारे, रवी तिजारे, आसाराम तिजारे, राजेंद्र कारेमाेरे, नाना ढेंगे, पप्पी लांजेवार, चंद्रभान चवरे, रवी निंबार्ते, जगल लांबट, प्रमादे लांबट, विदी तिजारे, ऋषी तिजारे तसेच पिपरी येथील शेतकरी उपस्थित हाेते. भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही कायदा मागे घेतल्याने आनंद व्यक्त केला आहे.
शेतकरी हिताशी तडजाेड नाही- सुनील मेंढे
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घाेषणा करताच माेदी सरकार झुकले, असे व्यक्तव्य करून स्वत:ची शेखी मिरविणाऱ्यांनी वास्तव्याचे भान ठेवून विचार करावा. कायदे मागे घेण्याची घाेषणा करताना एक व्यापक समिती गठीत करण्याचीही घाेषणा केली. याचाच अर्थ शेतकरी हिताशी तडताेड केली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. शेतकरी आंदाेलनाला घेवून राजकारण करीत हाेते. देशाची एकता, अखंडता आबाधित ठेवण्याचा दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आम्ही स्वागत करताे, असे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना गृहीत धरू नका - नरेंद्र भाेंडेकर
यापुढे काेणाचाही सरकारला शेतकऱ्यांना गृहीत धरून चालणार नाही. शेतकरी या देशाचा राजा हाेता आणि आजही ताे राजाच आहे. तीन कृषी कायदे करून केद्र सरकारने उशिरा का हाेईना चांगला निर्णय घेतला. सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत हाेत आहे. शेतकरी आता हळूहळू जागा हाेत आहे. त्यामुळे काेणताही निर्णय घेतना शेतकरी विराेधी निर्णय घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भाेगावे लागतील, असे भंडाराचे आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी सांगितले.
काॅंग्रेसने सुरुवातीपासून या कायद्याला विराेध केला हाेता. या कायद्याविराेधात लाखनी ते भंडारा पदयात्रा काढली. सत्याग्रह केला. बंदही पाळण्यात आला. कायदे मागे घेणे म्हणजे शेतकऱ्यांचा माेठा विजय हाेय. हा आम जनतेचा लढा हाेता.
- माेहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस
यापूर्वीच हे कायदे रद्द करायला हवे हाेते. मात्र, आता रद्द केले ही समाधानाची बाब आहे. आता अधिवेशनाची प्रतीक्षा न करता तत्काळ कायदे रद्द करण्याचे आदेश काढावे.
- नाना पंचबध्दे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे हे यश हाेय. या आंदाेलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची जबाबदार पंतप्रधानांनी घ्यावी. त्यांना आर्थिक मदत करावी.
- संजय रेहपाडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
तीन कृषी कायदे अस्तित्त्वात आले असते तर शेतकरी देशाेधडीला लागला असता. या कायद्याने उद्याेगपतींचाच फायदा झाला असता.
- हिरालाल नागपुरे, प्रगतीशील शेतकरी
शेतकऱ्यांच्या भविष्यावर गदा आणणारे तीन काळे कायदे अखेर रद्द झाले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचे हे प्रतीक असून, शेतकऱ्यांच्या विजय हाेय.
- यशवंत साेनकुसरे, जिल्हाध्यक्ष रायुकाॅं.
हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे सांगितले. कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या विचारांचा हा विजय झाला आहे. यानिमित्ताने एकीचे बळ काय असते, हे दिसून आले. शेतकरी हाच या देशाचा आधार आहे. त्यांच्या श्रमाची कदर व्हावी, असे ते म्हणाले.
- विनायक बुरडे, प्रगतशील शेतकरी, पालांदूर
भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशात स्वत: शेतकरी शेती करतात, म्हणूनच त्यांनी या तिन्ही कायद्यांना विराेध केला. शेतकऱ्यांच्या ताकदीचा आदर करीत हा कायदा मागे घेण्यात आला.
-राजेंद्र पटले, संस्थापक किसान गर्जना
तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घाेषणेचे आम्ही स्वागत करताे. कृषी कायदे मागे घेतल्याने आता राजकीय दुकानदारी बंद हाेईल. देशहितासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही सर्वानीच स्वागत केले पाहिजे.
- तारीक कुरैशी, भाजपचे नेते
केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही कृषी कायदे गुरुनानक जयंतीदिनी मागे घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी काेणतीही तडजाेड हाेणार नाही, हेच यातून पंतप्रधानांनी दाखवून दिले. तथाकथित शेतकरी नेते आणि विराेधी पक्षांनी अधिक खूप हाेण्याची आवश्यकता नाही.
- मुकेश थानथराटे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा
नकाे असलेले केंद्राचे तीन कृषी कायदे अखेर आज मागे घेण्यात आले. शेतकऱ्यांना देशाेधडीला लावणारे हे कायदे हाेते. हा खऱ्या अर्थाने आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय आहे.
- प्रसन्न चकाेले, काॅंग्रेस पदाधिकारी
चिवट व झुंजारु लढवय्या वृत्तीमुळे कृषी कायदे मागे घेण्यात आले आहे. गत वर्षभरापासून शेतकरी काेणतीही तमा न बाळगता आपल्या आंदाेलनावर ठाम हाेते. त्यामुळेच केंद्र सरकारला या शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले. हा लढा संपूर्ण देशासाठी एक आदर्श लढा म्हणून ओळखला जाईल.
- नितीन धकाते, नगरसेवक