उघड्यावरील हजारो क्विंटल धान घेण्यास केंद्रांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:27+5:30
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळातर्फे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रांवर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आले आहे. नियोजन नसल्याने अनेक दिवस धानाची मोजणी होत नाही. त्यामुळे धान भिजत आहे. मंगळवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत आलेल्या पावसाने पोत्यातून जमिनीवर सांडलेले धान अंकुरले आहेत.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शासकीय खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाच्या पोत्यांमध्ये पाणी शिरुन धान अंकुरले आहेत. त्यामुळे भिजलेले व अंकुरलेले धान घेण्यास केंद्रावर नकार दिला जात आहे. निसर्गाचा फटका आणि खरेदी केंद्रावरील मनमानी कारभारामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत.
जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळातर्फे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रांवर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आले आहे. नियोजन नसल्याने अनेक दिवस धानाची मोजणी होत नाही. त्यामुळे धान भिजत आहे. मंगळवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत आलेल्या पावसाने पोत्यातून जमिनीवर सांडलेले धान अंकुरले आहेत. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या धानाची होत असलेली नासाडी पाहून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
सध्या खुल्या बाजारात बारीक धानाला दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. तर शासकीय धान केंद्रावर बोनससह २५०० रुपये भाव जाहीर झाल्याने शासकीय केंद्रावर ठोकळ धानासह बारीक धानाची आवक वाढली आहे. अशातच धान्य ठेवण्यासाठी योग्य व समतल जागा मिळत नसल्याने मिळेल त्या जागेवर पोती ठेवली जात आहेत. कधी बारदाना संपल्याने तर कधी नैसर्गिक कारणांमुळे केंद्र बंद राहून धान खरेदीला विलंब होत आहे. १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचे धान खरेदीविना उघड्यावर पडून आहेत. पोती झाकण्यासाठी साधी ताडपत्री दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड दैना सुरू आहे.
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाची संततधार गुरुवारी दुपारीसुद्धा कायम होती. या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेले धान पाण्यात भिजून धान अंकुरले आहेत. आता ओले व अंकुरलेले धान खरेदी करण्यास केंद्रावर मनाई केली जात असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. खरेदी केंद्रावरील धान तात्काळ खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान हमीभाव खरेदी केंद्रावर उघड्यावर पडलेले आहेत. केंद्रावर पावसापासून धानाच्या पोत्यांचे बचाव करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना नाही. तर शेतकरी आपले धान वाचविण्याचे प्रयत्न करीत असले तरी जोरदार व गारपीट झाल्यास केंद्रावरील धानाचे मोठे नुकसान होणार आहे. याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत आहे.
रबी पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
खरीप हंगामात धान उत्पादन घेतल्यावर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोरी, वाटाणा, करडई, भूईमूग, आदी कडधान्ययुक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व पावसामुळे या पिकांना रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून या हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.