शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी केंद्र-राज्य सरकार असंवेदनशील

By Admin | Published: April 1, 2017 12:37 AM2017-04-01T00:37:19+5:302017-04-01T00:37:19+5:30

दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे,...

Center-state government insensitive about farmers' problems | शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी केंद्र-राज्य सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी केंद्र-राज्य सरकार असंवेदनशील

googlenewsNext

प्रफुल्ल पटेल यांचा आरोप : एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी करणार आंदोलने
भंडारा : दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असे असतानाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्याविषयी गंभीर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणांविरूद्ध येत्या १५ एप्रिलनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात धरणे, आंदोलने, निदर्शने करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या तीन वर्षात जिल्ह्यात कुठलाही विकास शोधून सापडत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर आधारीत समर्थन मूल्य नाही.
यापूर्वी देशात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना शेतमालाला योग्य तो भाव देण्यात आला होता. देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर शेतकऱ्यांना समर्थन मूल्य वाढवून दिले जाईल, अशी आश्वासने लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु मागील तीन वर्षांत एकही आश्वासने पूर्ण झालेली नाही. लोकसभा, विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली नाही.
शेतमालाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च, मजुरी, बियाणांचा खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारनियमनाच्या समस्यांनी शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पीकविमा योजनेचे काम खाजगी कंपनीला दिल्यामुळे एकाही शेतकऱ्याला पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या आहे. ‘भेल’ प्रकल्पाचे काम रखडले आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन निवडणुका जिंकणाऱ्या सरकारने जिल्ह्यात सुईच्या टोकाईतकाही विकास केलेला नाही. सामान्य माणसाचा जीवनस्तर तीन वर्षांत एक टक्काही सुधारलेला नाही. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण जिल्ह्यात धरणे, आंदोलने, मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले.
पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अ‍ॅड.जयंत वैरागड़े, सभापती नरेश डहारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Center-state government insensitive about farmers' problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.