‘स्वच्छ’ शाळांना मिळणार केंद्राचा पुरस्कार
By admin | Published: July 9, 2016 12:36 AM2016-07-09T00:36:22+5:302016-07-09T00:36:22+5:30
केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर गौरव
३१ जुलैपर्यंत नोंदणी, शासकीय व अनुदानित शाळा पात्र
भंडारा : केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने २ आॅक्टोबर २०१४ पासून देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ मिळावा यासाठी १ ते ३१ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राज्यात राबविण्यात आली होती. केंद्राने या विशेष अभियानाची दखल घेत राज्याचा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर लागू केला आहे. देशाची भावी पिढी शाळामध्ये आकार घेत असते. मुलांना लहान वयात लागलेल्या सवयी आयुष्यभर पुरतात. स्वच्छतेची सवय जर शाळेतील मुलांना लागली तर येणारी पिढी ही आरोग्य संपन्न व सुदृढ निपजेल. म्हणूनच असे कार्यक्रम हाती घेवून ते यशस्वी करण्याचा मानस या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाने व्यक्त केला आहे. या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर १०० शाळा, राज्य पातळीवर ४० शाळा आणि जिल्हा पातळीवर ४८ शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यातील ७० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील शाळांना देण्यात येतील. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा ५ क्षेत्रांमध्ये एकूण ३९ घटक निश्चित करण्यात आले आहेत. शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांची श्रेणी निश्चित करण्यात येईल व त्यावरूनच पुरस्कार विज्येत्या शाळेची निवड केली जाईल. शाळांना ३१ जुलैपूर्वी या पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. शाळांमधील संस्कार कायमस्वरूपी राहतील असा या मागचा उद्देश आहे. (शहर प्रतिनिधी)
पुरस्कारासाठी व्हीसी
शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी ५ जुलैला खास व्हीसी लावून याबाबत माहिती दिली. यावेळी उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, विद्या परिषदचे संचालक गोविंद नांदेडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक नामदेव जरग, युनीसेफचे आनंद बोरसे, सिद्धेश वाडकर यावेळी उपस्थित होते.
निवड समितीचे गठण
तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर शाळा निवडीसाठी समित्या गठीत करण्यात येईल. तालुकास्तर समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी, जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी तर राज्यस्तर समितीचे अध्यक्ष शिक्षण विभागाचे प्रधान सचिव असणार आहेत.
गुणांचे निकष व संकेत
९० ते १०० गुण हिरवा रंग
७५ ते ८९ गुण निळा रंग
५१ ते ७४ गुण पिवळा रंग
३५ ते ५० गुण केशरी रंग
३५ पेक्षा कमी लाल रंग
व्हीडीओ कॉन्फरन्सीगमधून शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल. शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल.
-किसन शेंडे, शिक्षणाधिकारी भंडारा.
शासनाचा हा स्तूत्य उपक्रम आहे. उशिरा का होईना एकदाचा स्वच्छ शाळांना पुरस्कार मिळतील. स्वच्छ, सुंदर व आदर्श शाळा ठेवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची ही पोचपावती ठरणार आहे. पुरस्कार मिळणार असल्याने शिक्षकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
-मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.