केंद्र सरकारने अघोषित आणीबाणी सुरू केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:58 AM2018-08-21T00:58:17+5:302018-08-21T00:58:53+5:30
केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. सत्तेत येण्याअगोदर दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सामान्य जनतेने भाजपला नाही तर विकास होईल यादृष्टीने मत दिलीत, परंतु सत्तेत येताच त्यांना विसर पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. सत्तेत येण्याअगोदर दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सामान्य जनतेने भाजपला नाही तर विकास होईल यादृष्टीने मत दिलीत, परंतु सत्तेत येताच त्यांना विसर पडला. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाच्या काही पत्रकांरानी विद्यमान सरकारचे पितळ उघड केल्याने त्यांच्या मुसक्या बांधण्याचे काम सुरू केले. देशात केंद ्रसरकारने अघोषित आणी-बाणी सुरू केली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार अनिल बावनकर, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, धनेंद्र तुरकर, रामलाल चौधरी, विवेकानंद कुर्झेकर, रेखा ठाकरे, जनबा मस्के, देवेंद्र चौबे, ईश्वर बाळबुद्धे, महेश जैन उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रामीण भागाच्या हिताचे नाहीत. त्यांनी सामान्य जनतेला भुलथापा देवून सत्ता प्राप्त केली. हे आता जनतेला कळू लागले आहे. त्यांच्याच परिणाम भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिले. आता आपल्याला पुढील २०१९ ची लढाई जिंकण्यासाठी बुथ कमिटी निर्माण करून तिला सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जावून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे, बबन मेश्राम, डॉ. रविंद्र वानखेडे, राजकुमार माटे, अविनाश ब्राम्हणकर, जगदिश निंबार्ते, शैलेश मयुर, नरेंद्र झंझाड, देवचंद ठाकरे, लोमेश वैद्य, डॉ. विकास गभने, बालु चुन्ने, असपाक पटेल, सुनिल शहारे, बाबुराव मते उपस्थित होते. प्रास्ताविक धनंजय दलाल यांनी, संचालन विजय डेकाटे यांनी तर आभार प्रा. एन.आर. राजपूत यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.