धान्य वितरण बंद; गरिबांच्या धान्याची काळजी कुणाला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:48 PM2024-08-02T14:48:29+5:302024-08-02T14:50:19+5:30
Bhandara : ग्राहकांचे स्वस्त धान्य दुकानांवर सातत्याने हेलपाटे
देवानंद नंदेश्वर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ई-पॉस मशीनमध्ये गत दोन महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रेशन लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना अडचणी येत आहे. वितरण बंद असल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांवर हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे गरिबांच्या धान्याची काळजी कोणाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्वस्त धान्य दुकानातील वितरण व्यवस्था ठप्प पडली आहे. आता प्रशासनाने ऑफलाइन धान्य वितरण करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या असल्या तरी ऑनलाइनचा तगादा स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्याने त्यांच्या द्विधा मनस्थिती आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण ८९० रेशन दुकाने आहेत. या दुकानांअंतर्गत २ लाख ४८ हजार ३३५ कार्डधारक आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात एकूण १० लाख ४ हजार ८९ लाभार्थी संख्या आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर मजुरी बुडवून दुकानांसमोर रांगेत उभे राहून धान्य घेत असतात. मात्र तासनतास उभे राहूनही ई- पॉस मशीन सर्व्हर डाऊन झाल्याने सुरू होत नाही. त्यामुळे कंटाळून ग्राहकांना परत जावे लागत आहे.
याबाबत रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांना पत्र देऊन अवगत केले आहे. परंतु यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला आहे. जिल्ह्यातील ८९० रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाकडून ई-पॉस मशीन दिल्या आहेत. या मशीनवर लाभार्थीची बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण केले जाते. मात्र रेंजची अडचण, कधी मशीन चालत नाही तर, कधी लाभार्थीच्या बायोमेट्रिक ओळखीत अडथळा निर्माण होतो. नव्या तंत्रज्ञानामुळे सुरुवातीपासूनच लाभार्थ्यांना समस्यांना सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात जिल्हा अन्न पुरवठा विभागाच्यावतीने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी जुलैचे वितरण करण्यासाठी कैरी फारवर्डची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. दुकानदारांनी ऑनलाईन वाटप पूर्ण करून घ्यावे, शुक्रवारी दुपारनंतर ही प्रक्रिया सुरु करण्यात येईल.
तालुकानिहाय दुकांनाची संख्या व एकूण लाभार्थी संख्या
तालुका लाभार्थी स्वस्त धान्य दुकान
भंडारा २०४१२१ १७४
लाखांदूर १०८२४५ ९६
लाखनी १२३०६१ १०८
मोहाडी १४०९५५ २२२
पवनी २३६३३८ १३३
साकोली २११२५० २०५
तुमसर १९०११९ १६३
ऑफलाइनचे आदेश पण वितरण किचकट
अडचणी लक्षात घेऊन आता प्रशासनाने ऑफलाइन धान्य वितरण करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या आहेत. माव ऑफलाइन वितरण केल्यानंतर दुकानदारांना ऑनलाइन प्रक्रिया राबवायची असल्याने ही प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे दुकानदार अडचणीत येण्याची शंका दुकानदारांनी व्यक्त केली.
कॅरी फॉरवर्ड पुन्हा सुरू करा
जुलै महिन्यात धान्य वितरण प्रक्रिया रखडल्याने जुलै महिन्याचे धान्य ऑगस्ट महिन्यात वितरित करावे. जुलै व ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे धान्य कॅरी फॉरवर्ड करून लाभार्थ्यांना त्याचे वितरण करावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांसह लाभार्थ्यांनी केली आहे. याकडे प्रशासनाला लक्ष देण्याची गरज आहे.
दरमहा ६२ हजार ७० क्विंटल धान्याची मागणी
जिल्ह्यात दरमहा वितरणासाठी ६२ हजार ७० विचेटल धान्याची मागणी केली जाते. जिल्ह्यातील ग्राहक संख्या व रेशन दुकानांची संख्या लक्षात घेता शासनाकडून धान्यांची मागणी केली जाते. गहू अंत्योदय लाभार्थासाठी ६ हजार ६७० क्चिटल तर, प्राधान्य कॉर्डधारकांसाठी ७ हजार ७५० विचेटल, असे एकूण १४४२० क्विंटल, तसेच तांदूळ अंत्योदय लाभार्थ्यांसाठी १६ हजार ६९० विचेटल व प्राधान्य लाभाथ्यांसाठी ३० हजार ९६० क्विंटलची मागणी केली जाते.
काय आहे कारण?
गत आठवड्याभरापासून राज्यात पावसाचा कहर सुरु आहे. या पावसामुळे आधार सिडींग होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पॉस मशीनमध्ये तांत्रीक अडचण आली आहे. यामुळे वितरणावर परिणाम दिसून येत आहे.
ग्राहकांची भूमिका
ई-पॉस मशीनीतील बिघाडाने स्वस्त दुकानदार परत पाठवीत आहेत, चार पाच चकरा मारून झाल्यामुळे आता कंटाळा आला आहे. परिणामी दुकानदारांसोबत वाद होत आहे. सर्व उपस्थित लाभाथ्यापैकी बोटावर मोजण्याइतकेच लाभार्थीचे ठसे लागतात. नंतर प्रक्रीया उप्प पडते. त्यामुळे भेदभावाची शंका निर्माण होते. वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणतात...
"जिल्ह्यातील ८८.८५ टक्के कॉर्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे, उर्वरित लाभार्थ्यांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वितरणात
समस्या निर्माण होत आहे. समस्या असल्याने ऑफलाइन धान्य वितरण करण्याच्या सूचना जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. लाभाथ्यांना
कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता दुकानदारांनी घ्यावी."
- रतनलाल ठाकरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा.
रेशन दुकानदार काय म्हणतात...
"सव्र्व्हर चालत नसल्यामुळे रेशन वितरण पूर्णपणे विस्वाळीत झाले. शिवाय केवायसी देखील करता येत नाही. त्यामुळे ग्राहकांशी शाब्दिक चकमक होत आहे. लवकरात लवकर सर्व्हर सुरळीत करावे व ई केवायसी दुसऱ्या यंत्रणेमार्फत करावी, जेणेकरून वाटप सुरळीत करता येईल."
-ताराचंद गिच्छेपुंजे, स्वस्त धान्य दुकानदार, खुडसावरी
"अनेक दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या सव्र्व्हर डाऊनमुळे रेशन वाटप करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे जुलै महिन्यातील धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी. रेशन दुकानादारासमोर उदभवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढावा."
- विलास वंजारी, धारणाव