‘मैत्र’ने वाचविले चितळाचे प्राण
By admin | Published: January 30, 2016 12:42 AM2016-01-30T00:42:25+5:302016-01-30T00:42:25+5:30
मंगळवारी वॉर्ड जवळील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याबाहेर जिवंत काढून प्राण वाचविले. ही घटना आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली.
पवनी : मंगळवारी वॉर्ड जवळील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याबाहेर जिवंत काढून प्राण वाचविले. ही घटना आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान घडली.
मोकाट कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे कालव्यात पडलेल्या चितळाला मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ढिवर बांधवाच्या मदतीने नहरातून बाहेर काढून त्या चितळाचे प्राण वाचविले. गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात चितळ पडल्याची माहिती मैत्रच्या पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे होताच मैत्रचे सचिव माधव वैद्य, महादेव शिवरकर व अन्य सदस्यांनी घटनास्थळ गाठले. वनविभागाचे क्षेत्रसहायक पी. एम. कांबळे, वनमजूर आर. एम. कुर्झेकर, हरीशचंद्र मुंडले व ढिवर बांधव यांच्या मदतीने कालव्यात पडलेल्या चितळाला बाहेर काढून धानोरी बिटातील कक्ष क्रमांक ३०७ येथे सोडून जिवनदान दिले.
मैत्रनी यापूर्वीही अनेक प्राण्यांना जिवनदान दिले असून मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहूसंस्था ही वन्यजीवांच्या संरक्षणाकरिता काम करीत असून वन्यजीवांचे संरक्षणाकरिता नेहमीच तत्परतेने कार्य करीत असते.
कालव्यात पडलेल्या चितळाला पाण्याचे बाहेर काढण्याकरिता सदस्य संघरत्न धारगावे, राहूल वाघमारे, प्रफुल रामटेके, अंकित बानाईत, अमोल बानाईत, वनविभागाचे धानोरी बिटाचे क्षेत्रसहायक पी. एम. कांबळे, वनमजूर आर. एम. कुर्झेकर, हरिशचंद्र मुंडले व ढिवर बांधव यांनी सहकार्य केले. मैत्रच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)