खाण सुरू करण्यासाठी चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:00 AM2021-07-30T05:00:00+5:302021-07-30T05:00:17+5:30
लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शासकीय कंपन्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहेगाव येथील कायनाईट खाण विक्रीचा त्यांचा डाव तर नाही ना ? अशी शंका माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील दहेगाव येथील गत ३० वर्षांपासून बंद असलेली कायनाईट खाण सुरू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारव्हा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल, विजय सावरबांधे, हेमकृष्ण वाडीभस्मे, अतुल परशुरामकर, तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, मोहन राऊत, राकेश राऊत, कल्पना जाधव, देविदास राऊत, सूरज मेंढे, सुनीता बिसेन, गीता लंजे, शकुंतला भैय्या, उषा झोडे, राजश्री मालेवार, वंदना गाकरे, निशा बगमारे, नरेश दिवठे, मिलिंद डोंगरे, बबन पिलारे, संतोष गोंधळे, गोविंदराव बरडे, अमोल बिडवाईक, जिकरीया पठाण, शंभू नैताम, विजय फुंडे, धनराज वासनिक, निवृत्ती ढोरे, रोषण बनकर सहभागी झाले हाेते. आंदोलनस्थळी जिल्हा खणीकर्म अधिकारी गजभीये यांना निवेदन देऊन कायनाईट खाण सुरू करण्यासंबंधाने केंद्र सरकारकडे आवश्यक कारवाईसाठी निवेदन देण्यात आले.
दहेगाव खाण विकण्याचा तर डाव नाही - राजेंद्र जैन
- लाखांदूर तालुक्यातील तब्बल ६० ग्रामपंचायतींनी ठराव करून खाण सुरू करण्याची मागणी केली. त्यावरून राज्य शासनाने केंद्र सरकारला खाण सुरू करण्यासाठी परवानगीची मागणी केली. मात्र, दोन वर्षांपासून केंद्राकडून दुर्लक्ष होते. केंद्राने गत काही वर्षांत विविध शासकीय कंपन्या विक्रीचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहेगाव येथील कायनाईट खाण विक्रीचा त्यांचा डाव तर नाही ना ? अशी शंका माजी आमदार राजेंद्र जैन यांनी यावेळी व्यक्त केली. ही लढाई आपण पूर्ण ताकदीनिशी लढू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
...तर तीव्र आंदोलन करणार - सुनील फुंडे
- गत ३० वर्षांपासून कायनाईट खाण बंद पडल्यामुळे या भागातील तीन हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. केंद्र सरकारने सहा महिन्यांत खाण सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगारांना सोबत घेऊन जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिला.