छकुली विचारते, ‘बाबा परत येणार काय’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:28 AM2019-05-04T00:28:10+5:302019-05-04T00:28:53+5:30
संघर्षमय जीवन असलेल्या भूपेशच्या अकाली जाण्याने वालोदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. शहीद भूपेशची चार वर्षांची छकुलीचा, ‘बाबा परत येणार काय?, हा उद्वीग्न प्रश्न मनाला गहिवरून सोडतो.
चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : संघर्षमय जीवन असलेल्या भूपेशच्या अकाली जाण्याने वालोदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. शहीद भूपेशची चार वर्षांची छकुलीचा, ‘बाबा परत येणार काय?, हा उद्वीग्न प्रश्न मनाला गहिवरून सोडतो. गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरूंग स्फोटात लाखनीच्या सुपुत्राचा संघर्षमय जीवनाचा करूण अंत झाला.
भूपेशच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, लहान भाऊ व त्यांची पत्नी, विधवा बहीण, गर्भवती पत्नी, मुलगी असा कुटुंब आहे. काही दिवसापुर्वी भूपेशचा लहान भाऊ चेतनला पक्षाघात आजाराने ग्रासले आहे. वृद्ध वडीलही आजाराने ग्रस्त आहेत. कुटुंबाची सर्व जबाबदारी भुपेशवर होती. भुपेशच्या अकाली जाण्याने वालोदे कुटुंबावर दुखांचे आभाळ कोसळले आहे. घराचा आधारस्तंभ कोसळल्याने कुटुंबाची विस्कटलेली घडी कशी सांभाळावी हा प्रश्न आहे.
भुपेशचे जीवन संघर्षमय होते. या संघर्षला वयाच्या ३४ व्या वर्षी पूर्णविराम मिळाला. भुपेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालयात झाले होते. इयत्ता ९ व्या वर्गात असल्यापासून विंधन विहिरी तयार करण्याचा व्यवसायात हात घातला. शिक्षणही सुरू ठेवले. कमवा आणि शिका यासोबत स्वत:च्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यातून सोडविला. आर्थिक परिस्थितीवर मात करून इयत्ता ११ व १२ वीचे शिक्षण पालांदूर कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. पैशांअभावी डीफॉर्म करू शकला नाही. समर्थ महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. भुपेश हा उत्तम व्हॉलीबॉलपटू व कबड्डीही खेळायचा. अनेक जिल्हास्तरीय व विभागस्तरीय स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले. समर्थ महाविद्यालयात एनसीसीचा विद्यार्थी म्हणून नावलौकीक मिळविला होता. त्याची नवी दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली होती.
समर्थ महाविद्यालयात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला होता. एनएसयुआयचा कार्यकर्ता असलेला भुपेशने महाविद्यालयीन जीवनात अनेक उपक्रमात सहभाग घेतला होता. भुपेशने भंडारा येथून डी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण केला व एका खासगी शाळेत शिक्षकाची काही काळ नोकरी केली.
२०११ मध्ये गडचिरोली येथे पोलीस भरतीला उभे राहिल्यानंतर प्रथमफेरीत त्याची निवड झाली. १२ मे २०१३ ला पोहरा येथील लिना कुंभलकर या मुलीशी त्याचा विवाह झालेला होता. संसार वेलीवर ‘माही’ नावाच्या गोड मुलीने पदार्पण केले. छकुलीच्या आगमनाने वालोदे कुटुंबात आनंदाची बहार आली. परंतु वेळीच नियतीने डाव साधला. भूपेशचे जाणे वालोदे कुटुंबीयाला सहन न करणारा आघात ठरला. शहीद भूपेशची पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. येणाऱ्या बाळाला आपल्या पित्याचा चेहरासुद्धा बघता येणार नाही. भूपेशच्या सुखरूप संसाराला डाव अर्ध्यावरच मोडला. एक हरहुन्नरी, हास्यविनोद करणार व सर्वांशी मिळवून घेणारा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया मित्रांनी दिली.
बदलीला आचारसंहितेचा फटका
कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्या- साठी भूपेशने पोलीस विभागाला बदलीचा अर्ज दिला होता. त्याची गडचिरोली जिल्ह्यात ६ वर्षाची सेवा झाली होती. त्याची बदली भंडारा जिल्ह्यात निश्चितपणे होणार होती. काही दिवसानंतर बदलीचे आदेश मिळणार होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे बदली लांबणीवर गेली. बदली आदेश मिळण्यापूर्वीच नक्षलवाद्याच्या स्फोटात भुपेशचा करूण अंत झाला.