रेती तस्करांसह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:20+5:30
भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा आहे. मात्र अलीकडे रेती तस्करीतून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. राजकीय आश्रयातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असली तरी या तस्करांपुढे महसूल पथक निष्प्रभ ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनाच वेळोवेळी कारवाईसाठी पुढे यावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शांतता प्रिय म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात अलिकडे रेती तस्करीसह गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. अवैध दारु, जुगार अड्डे, जनावरांची तस्करी यासह सक्रिय गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. या सर्वांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नव नियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या पुढे आहे. थेट मुंबईवरुन आलेल्या वसंत जाधव यांनी भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती असून ते गुन्हेगारीचा बिमोड करतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.
राज्यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले. भंडाराचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी मुंबई शहर शिघ्र कृती दलाचे पोलीस आयुक्त वसंत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
भंडारा जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा आहे. मात्र अलीकडे रेती तस्करीतून गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. राजकीय आश्रयातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महसूल विभागाची असली तरी या तस्करांपुढे महसूल पथक निष्प्रभ ठरले आहे. त्यामुळे पोलिसांनाच वेळोवेळी कारवाईसाठी पुढे यावे लागते. अनेकदा रेती तस्कर पोलिसांवर हल्ले चढवितात. अशा या रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आहे. या सोबतच जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जाते. यासोबतच गावागावात हातभट्टीची दारु गाळली जात असून जुगाराचे अड्डेही सुरु आहे. वरुन सर्व आॅलवेल दाखविण्याचा प्रयत्न असला तरी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत.
चोरीच्या घटनातही वाढ झाल्याचे अलीकडे दिसत आहे. या सर्वांना अंकूश आणण्यासाठी नवीन पोलीस अधीक्षक कोणती रणनिती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन एसपींना जिल्ह्याची खडान्खडा माहिती
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती आहे. सहा वर्षांपूर्वी ते भंडारा येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात त्यांनी गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबविली होती. आता अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शांतताप्रिय नागरिकांना नवीन पोलीस अधीक्षकांकडून आहे.