लाखांदूर प्रशासनाला रेती तस्करी थांबविण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:21+5:302021-06-11T04:24:21+5:30
लाखांदूर : चूलबंद व वैनगंगा नदी घाटातून गत काही महिन्यांपासून रेतीचे अवैध उत्खनन व दिवसाढवळ्या वाहतूक केली जात आहे. ...
लाखांदूर : चूलबंद व वैनगंगा नदी घाटातून गत काही महिन्यांपासून रेतीचे अवैध उत्खनन व दिवसाढवळ्या वाहतूक केली जात आहे. सदर बेकायदेशीर व्यवसाय केला जात असतांना खुद्द रेती तस्करांकडून प्रशासनिक संगनमत असल्याचा कांगावा केला जात असल्याने तालुक्यातील ७ घाटांवरील रेती तस्करी थांबविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
गत काही महिन्यांपासून लाखांदूर तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे. अल्पावधीत गर्भश्रीमंत होण्याच्या लालसेने झपाटलेले अनेक ट्रॅक्टर चालक व मालक रेती तस्करीचा गोरखधंदा सुरू करून रेती तस्करीच्या माध्यमातून शासनाला करोडो रुपयांचा चुना लावत आहेत.
तालुक्यातील दिघोरी मोठी, तावशी, खोलमारा, तई, धर्मापुरी, पांढरगोटा, मांढळ, भागडी, आथली व आवळी, टेंभरी या नदीघाटांतून राजरोसपणे दिवसाढवळ्या रेतीचा उपसा केला जात आहे. त्याची साठेबाजी करून ट्रॅक्टर व टिप्परने अवैध वाहतूक केली जात असल्याची ओरड आहे. तथापी, या संबंधीत गैरप्रकाराची तालुका प्रशासनाला माहिती असतानाही हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून या गैरप्रकाराला विरोध केला जात असताना रेती तस्करांकरवी हप्तेखोरीने बदनाम प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने नागरिकांत असंतोष व्यक्त केला जात आहे. तथापी, पावसाळा ऋतुला प्रारंभ झाल्याने येत्या काही दिवसांत तालुक्यातील सर्वच नदीघाटांवरील रस्ते बंद पडण्याची शक्यता आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील सर्वच नदीघाटांवरील रेती तस्करांनी राजरोसपणे रेतीचा उपसा करून साठेबाजी चालविल्याची खमंग चर्चा आहे.
दरम्यान, तालुक्यातील आवळी, टेंभरी रेतीघाट रेती तस्करांचा अड्डा बनल्याची ओरड असून, या घाटातून गत काही महिन्यांत करोडो रुपये किमतीच्या रेतीची तस्करी झाली आहे.
प्रतिक्रिया :
रेती तस्करी करताना आढळून येणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. रेती तस्करी थांबविण्यासाठी तालुका प्रशासन स्तरावर रेती घाटांचे मार्ग नदी काठालगत बंद करण्याची कारवाई केली जाईल.
: देविदास पाथोडे, नायब तहसीलदार