चांदपूर पर्यटनस्थळ हरविले
By admin | Published: May 27, 2015 12:41 AM2015-05-27T00:41:14+5:302015-05-27T00:41:14+5:30
लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी चांदपूर पर्यटनस्थळाला उतरती कळा लागली आहे.
मुख्यमंत्र्यांना साकडे
सरपंचाचे स्वाक्षरी अभियान
चुल्हाड (सिहोरा) : लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी चांदपूर पर्यटनस्थळाला उतरती कळा लागली आहे. भंडारा जिल्ह्यात एकमेव घोषित ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ आता हरविले असल्यामुळे सिहोरा परिसरातील सरपंचांनी चिंता व्यक्त केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी सरपंचांनी स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. विकासाच्या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षासोबत सलग्नीत असणारे सरपंच एकवटल्याने पर्यटन स्थळाला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता वर्तविण्यात यते आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ बंद आणि त्यांचे अवशेष घटनास्थळावर नसल्याने पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरविली आहे. परिणामी व्यवसाय पूर्णत: चौपट झाले आहेत. बाह्य चलन परिसरात परतण्याचे दरवाजे बंद झालेली आहेत. यामुळे विकासाला खिळ बसली आहे.
सन २००० मध्ये या पर्यटनस्थळाला राज्य शासनाने विकसीत करण्यासाठी मंजूरी दिली. भंडारा जिल्ह्यात एकमेव पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांनी गर्दी केली. गोंदिया, बालाघाट आणि भंडारा जिल्ह्यातील हा एकमेव पर्यटनस्थळ ठरल्याने अनेक राज्यातील पर्यटक आकर्षित झाले. या पर्यटनस्थळात जागृत हनुमान देवस्थानाने पर्यटक आणि भाविकांना मोह घातले. परंतु आॅगस्ट २०१२ मध्ये पर्यटन स्थळाचे कंत्राट संपले असता लचके तोडण्यात सुरुवात करण्यात आली. आधी कंत्राटदाराने साहित्यासह पळवापळवी केली. विटा आणि अन्य साहित्याची चोरी करण्यात आली. घटनास्थळावर कधी काळी पर्यटनस्थळ होते, अशा खुणा आजघडीला नाही. याचा फटका ब्रिटीशकालीन विश्रामगृहाला बसला. शासकीय संपत्तीची चोरी झाली. परंतु कुणी गांभीर्याने घेतले नाही. साधी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही. विकासाचा एक अध्याय इथे संपला असताना पुढे फाईल ठेवण्यात आले नाही. नागपूर स्थित हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न चर्चेला ठेवण्यात आला होता. मागील वर्षात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला राज्य शासनाने ग्रीन सिग्नल ुदिल्याने उदोउदो करण्यात आला. राजकीय पदाधिकाऱ्यांनी हातात तुणतुणे घेवून वाजविण्यास सुरुवात केली. अधिवेशन सत्रात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे चमू या पर्यटनस्थळात दाखल होऊन सर्व्हेक्षणही केले. परंतु हिवाळी अधिवेशन संपताच ही चमू मुंबईला गेली तर आजवर परतली नाही. फाईल आणि प्रक्रिया कुठे गेली हे सांगणारे कुणी नाही. (वार्ताहर)
पर्यटनस्थळात ३३ अस्थायी कामगार कार्यरत होते. पर्यटनस्थळ बंद झाल्याने रोजगार हिरावला आहे. रोज २०० पर्यटक दाखल होत असल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती.
- सतीश पटले,
माजी व्यवस्थापक, ग्रीनव्हॅली पर्यटनस्थळ चांदपूर
---------------------------------------
गावात मासिक सभेत पर्यटनस्थळ पुन्हा सुरु करणारा ठराव घेण्यात आलेला आहे. अन्य गावाचे सरपंचांनी तसे प्रयत्न सुरु केले असून हिवाळी अधिवेशन दिलेली वचनपूर्ती राज्य शासनाने पूर्ण करावी.
- छगनलाल पारधी,
सरपंच धनेगाव.