गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत चंद्रपूर मनपा अव्वलच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:42 PM2019-03-04T22:42:48+5:302019-03-04T22:43:13+5:30
गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली.
चंद्रपूर : गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली. या मोहिमेत संयुक्त प्रयत्नांनी चंद्रपूर महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आली असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जनतेच्या सहकार्याने शासकीय योजनाही १०० टक्के यशस्वी करता येतात, याचे उदाहरण चंद्रपूर शहरातील जनतेने देशासमोर ठेवल्याचे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
गोवर-रुबेला मोहिमेत शाळेतील १०० टक्के लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण केलेले मुख्याध्यापक, सक्रिय सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या.
मनपाच्या आरोग्य विभाग प्रमुख तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले की चंद्रपूर मनपातर्फे राष्ट्रीय गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राबविण्यात आली होती. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील चंद्रपूर शहरातील एकूण ८३ हजार ८७० लाभार्थ्यांपैकी एकूण ८३ हजार ४२ (९९%) लाभार्थ्यांचे मनपाने यशस्वीरीत्या लसीकरण केले.
जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी(शिक्षण) गणेश चव्हाण यांनी मोहिमेसाठी योगदान दिले. आय.एम.ए. अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, आय.ए.पी. अध्यक्ष डॉ एम. जे. खान व लायन्स क्लब अध्यक्ष शैलेश बांगला यांनी व त्यांच्या संस्थेतील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मनपाला या मोहीमेची यशस्वी अमलबजावणी करण्यास मोलाचे सहकार्य केले. मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी शरद नागोसे, सतीश अलोने, प्रवीण गुळघाणे, ज्योती व्यवहारे, शारदा भुक्या, सुकेशीनी बिलिवाने, गणेश राखूनडे, एम.आर. नोडल ग्रुप मधील डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ नरेंद्र जनबंधु, ग्रेस निठुरी आणि सात शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.