लाखनीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदलले रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:23 PM2018-10-06T22:23:09+5:302018-10-06T22:23:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कुठलेही काम पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केल्यास व त्याला मेहनतीची जोड मिळाल्यास ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. अशीच प्रचिती लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बदललेल्या स्थितीचे पाहून येते. भकास स्थितीत असलेल्या या दवाखान्याचे रूपडे पालटले असून पशुधन विकास अधिकाऱ्याच्या पुढाकाऱ्याने हा दवाखाना अन्य तालुकांसमोर आदर्श ठरला आहे.
जिल्ह्यात एकीकडे पशुधनाची संख्या सातत्याने रोडावत असताना शासन व प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शासनातील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उच्च कोटीचे असल्याचे लाखनी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कामे पाहून दिसून येते. एक महिन्यापुर्वी लाखनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मध्ये भंडारा पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागातील डॉ. गुणवंत भडके हे पशुधन विकास अधिकारी म्हणून लाखनीत रूजू झाले. यावेळी हा दवाखाना अत्यंत भकास स्थितीत होता. परिस्थितीची जाणीव लक्षात घेत डॉ. भडके यांनी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना तथा ग्रामस्थांना विश्वासात घेवून या दवाखान्याचे स्वरूप बदलण्याचा संकल्प सोडला.
अल्पावधीतच सर्वांच्या श्रमदानातून या दवाखान्याचे स्वरूप बदलले. भिंतींना रंगरंगोटी करण्यात आली. दवाखान्याचे नावही दिसत नव्हते. ठळकपणे आता ते दिसू लागले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली झाडे, झुडपी वाढली होती. येणाऱ्या गोपालकांना हा पशुवैद्यकीय दवाखाना भंगारावस्थेत आहे की काय असा वाटायचा. मात्र डॉ. भडके व त्यांच्या चमूने या संपूर्ण परिसराचे कायापालट करून रंगरंगोटी व ठिकठिकाणी वृक्षारोपणही केले. दवाखान्यातील सोयी-सुविधांचाही व देखरेखीची जबाबदारीही त्यांनी यशस्विरित्या सांभाळली आहे. ही बाब अन्य तालुक्यांसाठी आदर्श ठरत आहे.