राजकारणाची बदलती दिशा विकासाला मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:07 AM2019-08-17T01:07:31+5:302019-08-17T01:08:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गत दोन-तीन वर्षात राजकारणाची दिशा बदलली असून पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत दोन-तीन वर्षात राजकारणाची दिशा बदलली असून पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी आपला फायदा करून घेत आहे. हा प्रकार विकासासाठी मारक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलिकडे नेत्यांना विकासाची दुरदृष्टी नाही. पैसा, ठेकेदारी आणि सत्तेच्या भरोशावर राजकारण केले जात आहे. भावनात्मक प्रचार करून तात्कालीक फायदा करून घेतला जातो. समाजसेवा, चांगले काम करण्याची वृत्ती, क्षमता आणि दुरदृष्टी राजकीय नेत्यांमधून हरवत चालल्याचे दिसत आहे. हा प्रकार आता जनतेने समजून घेतला पाहिजे अन्यथा भंडारा जिल्हा विकासापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार पटेल म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने ३७० कलम काश्मीरमधून हटविले. सुरूवातीला आम्ही त्यांच्या विरोधात नव्हतो. परंतु ज्यापद्धतीने त्यांनी काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशाशित प्रदेश केला. त्यामुळे आम्ही नाराज झालो. परिणामी आम्ही मतदानातही भाग घेतला नाही, असे त्यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती उत्पादन निर्यातक्षम करण्याचा प्रयत्न
भंडारा जिल्ह्यातील शेती उत्पादन निर्यातक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. जिल्ह्यात धानासोबतच मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. यासाठी काही मार्केटिंगसाठी योजना तयार केली जात आहे. त्याला आम्ही लवकरच मूर्त रूप देवू. यातून या भागातील शेतकऱ्यांना दोन पैसे अधिकचे मिळतील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याबाबत विचारले असता खासदार पटेल म्हणाले, ही मोठी बाब नाही. पत्रपरिषदेला माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल उपस्थित होते.