चरण वाघमारे यांनी केली पाच व्हीव्हीपॅट मशीन तपासण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:18 PM2024-11-24T12:18:59+5:302024-11-24T12:20:37+5:30
Bhandara Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results Winning Candidate : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला नकार
तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे यांनी मतदानानंतर संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तुमसर तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्राला भेट देऊन, आपण सुचविलेल्या पाच व्हीव्हीपॅटची आपल्या समक्ष तपासणी करावी, अशी मागणी केली. मात्र त्यांच्या अर्जाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी आदेश देऊन स्पष्ट नकार दिला. ही माहिती जाणून घेण्याकरिता माध्यम प्रतिनिधी मतदान केंद्राकडे गेले. मात्र त्यांची प्रतिक्रिया घेण्यापासून पोलिसांनी सर्वांना रोखले.
मतमोजणी सुरू असताना सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चरण वाघमारे मतमोजणी केंद्रावर पोहचले. आपण सुचवू त्या कोणत्याही पाच व्हीव्हीपॅट मशीनची आपल्यासमोर तपासणी करावी, असा लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दर्शन निकाळजे यांना दिला. परंतु यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. वाघमारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी उत्तराची मागणी केली. अर्ध्या तासानंतर अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले.
आपला कायदेशीर अधिकार नाकारला : वाघमारे
आपण या मतदार संघातील उमेदवार आहेत. त्यामुळे आक्षेप घेण्याचा आणि अधिकार आपणाला आहे. आपण सुचविलेल्या पाच व्हीव्हीपॅट मशीन आपल्यासमोर तपासणी करण्याच्या आपल्याला कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तशी लेखी मागणी केली. परंतु त्यांनी ती मान्य केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांना हा प्रकार कळविला आहे, असे वाघमारे यांनी 'लोकमत' ला सांगितले.
माध्यम प्रतिनिधींना मज्जाव
संध्याकाळी अखेरच्या फेरीचा निकाल घेण्याकरिता माध्यम प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जाताना तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी सर्वांना मुख्य प्रवेशद्वाराचे रोखले. एकदा बाहेर निघाल्यानंतर दुसऱ्यांदा आत जाता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या फेरीतील निकालाकरिता माध्यम प्रतिनिधींना भटकावे लागले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.