प्रभारीने फोडले कार्यकारी अभियंत्यांवर खापर
By admin | Published: June 25, 2016 12:21 AM2016-06-25T00:21:24+5:302016-06-25T00:21:24+5:30
माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी आलेला १ कोटी ७३ लाखांचा निधी परत गेला.
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : १.७३ कोटी परत गेल्याची कबुली
प्रशांत देसाई भंडारा
माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी आलेला १ कोटी ७३ लाखांचा निधी परत गेला. तथा निविदांमध्ये झालेल्या चुकांना कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे जबाबदार असल्याचे खापर प्रभारी कार्यकारी अभियंता रामदास भगत यांनी फोडले. शुक्रवारला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा होती. यावेळी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही कबुली दिली.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिला होता. मात्र त्या निधीतून काम न करताच तो शासनाला परत पाठविण्यात आला. यासोबतच माजी मालगुजारी तलावांच्या कामांसाठी निविदा मागविल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक चूक लपविण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार चुका होत गेल्या. शुक्रवारला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. यात उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या वृत्त मालिकेबाबत भगत यांना विचारले. यावेळी भगत यांनी लघु पाटबंधारे विभागाने कामे न करताच १ कोटी ७३ लाखांचा निधी परत पाठविला आहे. बातम्यांमध्ये सत्यता असून निविदांमधील अनियमिततेत कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे दोषी असल्याचे सभागृहात सांगितले.
प्रभारी कार्यकारी अभियंता रामदास भगत यांनी १ कोटी ७३ लाखांचा निधी परत गेल्याचे सांगून या सर्व प्रकरणाला पराते हे जबाबदार असल्याची सभागृहात कबुली दिली. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. याला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे जबाबदार असून त्यांचे एकाही अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही.
- राजेश डोंगरे, उपाध्यक्ष जि.प. भंडारा.
सभागृहातील विषयाची तुम्हाला माहिती झालेली आहे. त्यावर पुन्हा काय बोलू? उद्या जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक असल्याने त्याची तयारी करीत आहे. त्यामुळे सोमवारला कार्यालयात या, तुम्हाला सविस्तर माहिती देतो.
- रामदास भगत, प्रभारी कार्यकारी अभियंता, भंडारा.