फेसबुकवरील ‘चॅटिंग’ पडली महागात
By Admin | Published: May 23, 2016 12:37 AM2016-05-23T00:37:08+5:302016-05-23T00:37:08+5:30
फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र पोस्ट केल्यामुळे मोहाडी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील एका तरुणाला अटक केली आहे.
तरुणाला अटक : युवक-युवतींना सोशल मीडियावर सावधान होण्याची गरज
मोहाडी : फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र पोस्ट केल्यामुळे मोहाडी पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील एका तरुणाला अटक केली आहे. त्याला मोहाडी येथे तपासासाठी आणण्यात आले आहे.
मोहाडी परिसरातील एका युवतीशी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील एका तरूणाने फेसबुकद्वारे ओळख केली. ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत झाले. त्यानंतर मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर हा तरूण मोहाडीत येऊन त्या तरुणीशी भेटायचा. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही तरूणी शासकीय कर्मचारी आहे. हा तरूण शिक्षण घेत असला तरी उच्चशिक्षीत असल्याचे तिला सांगितले होते. त्यावरून युवतीला त्याचा संशय आल्याने तिने त्याची चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले. खोटे का बोललास या कारणावरून त्या युवतीने त्याच्याशी सबंध तोडले. मात्र त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. आपल्याशी ती लग्न करणार नसल्याचे लक्षात येताच त्या तरूणाने फेसबुकवर आपत्तीजनक मजकूर व छायाचित्र अपलोड केले. त्यामुळे त्या युवतीची बदनामी झाली. त्यानंतर त्या युवतीने थेट मोहाडी पोलिस ठाणे गाठून त्या तक्रार दाखल केली.
मोहाडी पोलिसांनीही या प्रकरणात तत्परता दाखवून सायबर सेलच्या मदतीने त्या युवकाचा पत्ता शोधून काढला व त्याला जेरबंद केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुहास चौधरी, जगन्नाथ गिरीपुंजे हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
आरोपीचे नाव सांगण्यात पोलिसांचा नकार
या प्रकरणातील तरुणाचे नाव जाहिर करण्यास मोहाडी पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्याचे नाव प्रकाशित करता आले नाही. सध्या सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापरहोत असून चांगल्या गोष्टी सोबतच वाईट गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे. सोशल मीडियावर आपत्तीकारक मजकूर, छायाचित्र किंवा व्हिडीओ टाकणे हा गुन्हा असून सायबर सेलद्वारे त्याचा तपशील शोधून काढून अटक होऊ शकते. त्यामुळे युवकानी फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियावरील मजकूर किंवा छायाचित्र जरा सांभाळून पोस्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा या प्रकरणातील युवकासोबत जे घडले ते कोणासोबतही घडू शकते. या युवकावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे शासकिय नोकरीचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे युवक युवतींनी सावधान होण्याची गरज आहे.