स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तूरदाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 09:27 PM2018-11-20T21:27:11+5:302018-11-20T21:27:33+5:30
महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत.
सिलबंद पाकीट असून सुद्धा त्यातील दाळ सडलेली आहे. तशी दाळ जनावरे सुद्धा खाणार नाहीत, अशी दाळ जनतेला देवून शासन गरीबांची थट्टा करीत आहे का असा सवाल नागरिक करीत आहेत.
राशन दुकानातून देण्यात येत असलेली तुरदाळ महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमीटेड मुंबई करीता श्री सप्तश्रृंगी कंपनी, नवी मुंबई तथा सोनु मोने इंडस्ट्रीज, लगडगंज नागपूर यांनी प्रोसेसींग व पॅकेजींग केली आहे. सप्तश्रृंगी कंपनीने तर पाकीटावर बॅच नंबर, पॅकेजींगची तारीख सुद्धा टाकलेली नाही. मोहाडी येथील राशन दुकानात आलेल्या तुर दाळीच्या पाकीटापैकी काही पाकीटातील दाळ सडलेल्या अवस्थेतील आहे. राशन दुकानदारांनी सुद्धा त्या पाकीटाची तपासणी न करता निकृष्ट दर्जाची ती दाळ राशन कार्ड धारकांना दिली. काही जागरूक नागरिकांनी याची तक्रार येथील अन्न निरीक्षक बावरे यांच्याकडे केली असता त्यांनी ते निकृष्ठ दर्जाचे पाकीटे बदलवून दिले.
चना, उळद डाळ आलीच नाही
शासनाने जनतेला दिवाळी भेट म्हणून राशन दुकानातून चणा व उळद दाळ देण्याची घोषणा केली होती. मात्र या दाळीचा कोटा कमी प्राप्त झाल्याने मोहाडी येथील काही राशन दुकानात दिवाळीला चणा व उळद दाळ आलीच नाही.
ही दाळ डिसेंबरच्या राशन सोबत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. एवढेच नाही तर जेवढे कार्डधारक आहेत त्यापैकी अर्ध्या कार्डधारकांनाच ही दाळ मिळेल. कारण सर्व कार्डधारकांना वाटप करता येईल इतकी दाळ मोहाडी तहसिल कार्यालयाला पाठविण्यात आलेली नाही.
शासन घोषणा अवश्य करते मात्र त्याची अंमलबजावणी करीत नाही, अशी भावना अनेक गरीब नागरिकांनी व्यक्त केली आहे.
एक दोन दाळीचे पाकीट खराब निघाले असतील पण तशी तक्रार आली नाही. सर्वांना मिळेल एवढा चना व उळद दाळीचा पुरवठा झालेला नाही तसे आमचे प्रयत्न सुरू आहे.
-सागर बावरे, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय मोहाडी.