स्वस्त धान्य दुकानदार ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:21 PM2018-07-17T22:21:00+5:302018-07-17T22:21:16+5:30
स्वस्त धान्यासाठी बीपीएल कार्ड तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी मंगळवारी रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वस्त धान्यासाठी बीपीएल कार्ड तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी मंगळवारी रंगेहात पकडले.
राजेश मनिराम आगलावे (४६) रा.गंगानगर खात रोड भंडारा असे लाचखोर स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराकडे एपीएल केशरी कार्ड होते. नियमानुसार स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ व इतर धान्य मिळत होते. परंतु जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी तक्रारदार गेला असता राजेश आगलावे याने एपीएलचे कार्ड बंद झाल्याचे सांगितले. नवीन कार्ड हवे असल्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणाची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली. मंगळवारी सापळा रचून दोन हजार रुपये स्वीकारताना राजेश आगलावे याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, प्रतापराव भोसले, गणेश पोटवार, गौतम राऊत, रविंद्र गभणे, सचिन हलमारे, शेखर देशकर, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मीक यांनी केली.