आंतरराज्यीय सीमेवर तपासणी नाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 09:49 PM2018-09-09T21:49:13+5:302018-09-09T21:49:28+5:30
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावात कायमस्वरुपी पोलीस चौकीचे प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या सीमेवर खासगी घरात तात्पुरत्या स्वरुपात तपासणी नाका सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अवैध साहित्याची आदान प्रदान प्रकारावर आळा बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावात कायमस्वरुपी पोलीस चौकीचे प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या सीमेवर खासगी घरात तात्पुरत्या स्वरुपात तपासणी नाका सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अवैध साहित्याची आदान प्रदान प्रकारावर आळा बसणार आहे.
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावात कायमस्वरुपी पोलस चौकी मंजूरी करण्याची ओरड सिहोरा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. या सीमेच्या हाकेच्या अंतरावर दोन नक्षलग्रस्त जिल्ह्यांचे सीमा आहेत. नजीकच्या मध्यप्रदेशातून जिल्ह्यात अवैध साहित्याची आयात भंडारा जिल्ह्यात याच सीमेवरून करण्यात येत आहे. या शिवाय धाडसी चोरी प्रकरणाचे आरोपी याच सीमेवरून मध्यप्रदेशात पलायन करीत आहे. बपेरा ही आंतरराज्यीय सीमा मोकाट सोडण्यात आल्याने वन विभागांची यंत्रणा त्रस्त झाली आहे. मौल्यवान वृक्षांची तस्करी याच सीमेवरून नागपूरपर्यंत करण्यात येत आहे. महसूल विभागाला सीमा मोकाट असल्याने लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. मध्यप्रदेशातून अनेक मौल्यवान खनिज साहित्याची खुलेआम आयात सीमेवरून सिहोरा परिसरात करण्यात येत आहे. दारु आणि मोहफुलची आयात दिवसाढवळ्या केली जात आहे. पोलीस प्रशासनाने बपेरा सीमेवर तपासणी नाका मंजुरीला हिरवा कंदिल दाखविला आहे. हा मंजुरीला कंदील अनेक वेळा विझला आहे. देवसर्रा गावाचे हद्दीत आधी इमारत बांधकाम करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. कागदी घोडे नाचविण्यात आली आहेत. परंतु प्रत्यक्षात इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा करण्यात आलेला नाही. या जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात येत आहे. निवडणुकीचे काळात बपेरा सीमा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येत असली तरी नंतर जैसे थे अवस्था राहत आहे. पोलीस प्रशासनाने बपेरा आंतरराज्यीय सीमा कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्तात ठेवण्याची पोलीस चौकीचे प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बपेरा गावात राज्य मार्गावर खासगी घराची पाहणी करण्यात आली आहे. या घरात पोलीस चौकीचे उद्घाटनाला जिल्हा पोलीस अधीक्षक येणार असल्याची माहिती आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक येणार असल्याने पोलिसांची रिक्त पदे भरणारा पिटारा घेवून येण्याचा आशीर्वाद निर्माण झाला आहे. सिहोरा पोलीस ठाण्यामध्ये ५३ पोलिसांची पदे आहेत. पोलीस ठाण्यात केवळ २५ पोलीस कार्यरत आहेत. २५ पोलीस पैकी १० पोलीस नियमित अन्य बाहेरील कामात व्यस्त आहेत. यात नियमित रजेवर असलेल्या पोलिसांचा समावेश आहे. याशिवाय ८ ते १०पोलीस कार्यालयात प्रशासकीय कामकाज बघत असताना ५ बिटाची जबाबदारी सांभाळणारे पोलीस नाहीत. पोलिसावर कामाचा वाढता ताण असताना महसूलची चोरी थांबविण्याची जबाबदारी त्यांचे खांद्यावर देण्यात आली आहे.