रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 05:00 AM2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:57+5:30

भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

Chemical fertilizers will now cost Rs 1,600 more per hectare | रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

रासायनिक खतांसाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागतील

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांत संतापाची लाट

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीने धान उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. रासायनिक खतासाठी आता हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
भंडारा जिल्ह्यात धानासह भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र आता रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमतीत सरासरी २०० ते २५० रुपये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. धानासाठी हेक्टरी ८ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचाही मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळत नाही. धान विकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. विकलेल्या धानाचे पैसेही मिळत नाही. हाती आलेले पैसे मेहनतीच्या मानाने अतीशय तुटपुंजे असते. त्यातच डिझेल आणि खतांची दरवाढ शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटणारी ठरु शकते. पुर्वी शेतकरी शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु अलिकडे शेणखत मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करतात. खताची मात्रा दिली नाही तर शेतातुन अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. 

महागाईची हद्द झाली
डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. शेतीशी निगडित बहुतांश कामे आता ट्रॅक्टर व इतर यांत्रिक साह्याने केली जात आहे. मात्र दरवाढ झाल्याने शेतकरी आता परंपरागत पद्धतीने मशागत करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

ट्रॅक्टरच्या मशागतीचा ८०० रुपये तास
इंधनाच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरचे मशागतीचे दर प्रति तास ६०० रुपये होते. परंतु आता ८०० रुपये प्रति तास झाले आहेत. एका एकराला नागरटीपासून ते चिखलणीपर्यंत साडेतीन तास ट्रॅक्टर हवा असतो. पूर्वी २१०० रुपये एकरी खर्च यायचा. परंतु तो आता २८०० पर्यंत पोहोचला आहे. शेतकरी आता परंपरागत पद्धतीने बैलाच्या साहाय्याने मशागत करावी काय, अशा विचारात दिसत आहे.

खताच्या किमती वाढल्याने आमचे गणित बिघडणार आहे. आधीच लागवड खर्चही निघत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि किडनीचा प्रादुर्भाव यामुळे धान उत्पादक अडचणीत आले आहेत. खताच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.
-ललीराम खंडाईत, दिघोरी (मोठी)

भंडारा जिल्ह्यात बहुतांश शेतकरी धानाची शेती करतात. धान पिकाला खताची मात्रा मोठ्या प्रमाणात लागते. परंतु आता २०० ते २५० रुपये दरवाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडणार आहे. शासनाने खताचे दर तरी नियंत्रणात ठेवावे.
-नामदेव आंबेडारे, पारडी

डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्चही वाढत आहे. शेतीचा दिवसेंदिवस खर्च वाढत असताना आता सर्वत्र महागाई दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला तीच किंमत मिळत आहे. यामुळे शेती हा घाट्याचा व्यवसाय झाला आहे.
-माधवराव झोडे,  मुर्झा

धानासह सर्वच पिकाला रासायनिक खताची गरज असते. शेतकरी रासायनिक खत विकत घेतात. मात्र अलिकडे वाढत्या किमतीने रासायनिक खत विकत घेणे शेतकऱ्यांसाठी कठीण जाईल. त्याचा परिणाम उत्पन्नावर होईल.
-विष्णूदास हटवार, चिखली

 

Web Title: Chemical fertilizers will now cost Rs 1,600 more per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.