‘त्या’ अपघातात छत्तीसगडची अभिनेत्री ठार; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शाेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 11:31 AM2022-07-16T11:31:09+5:302022-07-16T12:32:51+5:30

या अपघाताचे वृत्त कळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पुष्पांजली शर्मा यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला.

Chhattisgarh actress killed in bhandara travels accident; CM Bhupesh Baghel expressed his condolences | ‘त्या’ अपघातात छत्तीसगडची अभिनेत्री ठार; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शाेक

‘त्या’ अपघातात छत्तीसगडची अभिनेत्री ठार; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केला शाेक

Next

साकाेली (भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावर साकाेली तालुक्यातील माेहघाटा जंगलात झालेल्या ट्रक-ट्रॅव्हल्सच्या अपघातातछत्तीसगडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पुष्पांजली शर्मा (५४) ठार झाल्याची माहिती पुढे आली. त्या तीर्थयात्रेसाठी उज्जैनला गेल्या हाेत्या. परतीच्या प्रवासात गुरुवारी पहाटे हा भीषण अपघात झाला.

माेहघाटा जंगलात नादुरुस्त उभ्या ट्रकवर गुरुवारी पहाटे ५.३० वाजता नागपूरवरून रायपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स आदळली. या भीषण अपघातात दाेन जण ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले हाेते. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे सुरुवातीला ओळख पटविणे कठीण झाले हाेते. साकाेली पाेलिसांनी अपघातातील मृतांची ओळख पटविली. मात्र, त्यांची पुरेशी माहिती पाेलिसांकडेही उपलब्ध नव्हती.

उभ्या ट्रकवर भरधाव ट्रॅव्हल्स आदळली; दोघे ठार, आठ जण गंभीर जखमी

दरम्यान, शुक्रवारी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पुष्पांजली शर्मा या छत्तीसगडमधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री असल्याचे पुढे आले. त्या उज्जैन येथे तीर्थयात्रेसाठी गेल्या हाेत्या. तेथून नागपूरमार्ग त्या रायपूरकडे ट्रॅव्हल्सने  (सीजी-०८/एएस-०८९१) जात हाेत्या. माेहघाटा जंगलात हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताचे वृत्त कळताच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी पुष्पांजली शर्मा यांच्या निधनाबद्दल शाेक व्यक्त केला. पुष्पांजली या उत्तम कलाकार हाेत्या. त्यांनी राज्यातील नागरिकांचे मनाेरंजन केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री बघेल यांनी शाेकसंवेदना व्यक्त केल्या.

'टूरा रिक्षावाला'मुळे मिळाली ओळख

पुष्पांजली शर्माने छत्तीसगडी, भोजपुरीसह १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश जैन दिग्दर्शित 'टूरा रिक्षावाला' या छत्तीसगढी चित्रपटातून त्यांना ओळख मिळाली. यासोबतच त्यांनी अनेक लघुपटांमध्येही काम केले. काही अल्बमही केले. छत्तीसगडी चित्रपटात आई किंवा वहिनीच्या भूमिका त्या साकारत होत्या. त्याद्वारेही घरा-घरात पोहोचल्या होत्या. सध्या त्या छत्तीसगडी मालिका 'रामायण राम की लीला'मध्ये माता कौशल्याचे पात्र साकारत होत्या.

Web Title: Chhattisgarh actress killed in bhandara travels accident; CM Bhupesh Baghel expressed his condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.