Video : काय सांगता! भंडाऱ्यात अट्टल दारुडा काेंबडा, दरराेज हवा ४५ मिलीचा पेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 04:49 PM2022-06-03T16:49:04+5:302022-06-03T19:12:47+5:30
या काेंबड्याचा दारू पिण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.
भंडारा : दारूचे व्यसन लागलेले अनेकजण आसपास दिसतात. मात्र काेंबड्याला दारुचे व्यसन लागल्याचे आपण ऐकले काय? नाही ना, पण हे खरे आहे. भंडारा तालुक्यातील एका कोंबड्याला चक्क दारुचे व्यसन लागले आहे. त्याला दररोज ४५ मिलीचा पेग लागतो, दारू मिळाल्याशिवाय तो चारा पाण्याला तोंडही लावत नाही.
हा अजब कोंबडा आहे भंडारा शहरानजीकच्या पिंपरी पुर्नवसन गावातील. शेतकरी भाऊ कातोरे यांनी छंदातून कुकुटपालन सुरू केले. अनेक प्रजातीचे कोंबडे त्यांच्याकडे आहे. यातील एका कोंबड्याला वाईट व्यसन लागले. दररोज दारू प्राशन केल्याशिवाय हा कोंबडा राहत नाही. दारू दिली नाही तर तो चारापाण्यालाही तोंड लावत नाही. यामुळे भाऊ कातोरे चिंतीत आहे. हा व्यसनी कोंबडा भाऊ कातोरे यांचा जीव की प्राण आहे. यामुळे त्याच्या प्रेमापोटी भाऊ कातोरे महिन्याला दोन हजार खर्च करुन कोंबड्याचा शौक पूर्ण करतात. या कोंबड्याचा दारू पिण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काय सांगता ! भंडाऱ्यात अट्टल दारुडा काेंबडा, दरराेज हवा ४५ मिलीचा पेग pic.twitter.com/RrwCkD47Js
— Lokmat (@lokmat) June 3, 2022
अशी लागली दारुची लत
गतवर्षी कोंबड्यांवर मरी रोग आला होता. कोंबड्यांनी खाणेपिने सोडले होते. या रोगावर उपाय म्हणून कुणीतरी कोंबड्यावर दारू पाजण्याचा सल्ला दिला. भाऊ कातोरे यांनी आपल्या कोंबड्यांना मोहफुलाची दारू पाजली. मात्र मोहफुलाची दारू मिळणे कठीण झाल्याने या कोंबड्याला विदेशी दारू देणे सुरू केले. यामुळे यातील एका कोंबड्याला चक्क दारुची लत लागली.
कोंबड्याची दारू सोडविण्याचे प्रयत्न
भाऊ कातोरे निर्व्यसनी आहेत. मात्र कोंबड्यासाठी त्यांना दारू आणावी लागते. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी ते लपून दारू आणण्यासाठी जाजत. या कोंबड्याची दारू सुटावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पशुवैद्यकीय दवाखान्यातही त्यांची पायपीट सुरू आहे. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोंबड्याला दारुच्या वासाची एखादी औषधी पाजण्याच्या सल्ला दिला असून हळूहळू प्रमाण कमी केल्यास दारू सुटेल असे सांगितले आहे. आता त्याची दारू सुटेल की नाही, हे वेळच सांगेल.