परातेंच्या घुमजावात अडकले मुख्य कार्यकारी अधिकारी
By admin | Published: June 18, 2016 12:20 AM2016-06-18T00:20:18+5:302016-06-18T00:20:18+5:30
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील सहा महिन्यापूर्वी कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांची दोन प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असून....
प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : ‘त्या’ अभियंत्यांची कार्यालयीन चौकशी सुरु
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील सहा महिन्यापूर्वी कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांची दोन प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असून त्यांच्याकडे कार्यभार सोपविणे योग्य नसल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्याच पराते यांनी दोन दिवसापूर्वी भगत यांच्याकडे कार्यभार सोपविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातीेल कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी या गैरप्रकरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘लोकमत’ वृत्त मालिकेमुळे कार्यकारी अभियंता व जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदर प्रकरण अंगलट येईल, या भीतीने कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी वैद्यकीय रजा घेतली. एकीकडे कामे पूर्ण करण्यासाठी १५ दिवस शिल्लक असताना पराते हे रजेवर गेल्याने कामांचा खोळंबा होऊ नये, म्हणून त्यांनी अधिनस्थ उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी आॅक्टोबर महिन्यात सीईओंना पत्र देऊन सदर विभागात बदल्या किंवा कार्यभार सोपविण्याची चर्चा करूनच कार्यवाही करावी, असे म्हटले असतानाही त्यांनाही विश्वासात घेण्यात आलेले नाही.
भगत आता कार्यक्षम झाले कसे?
कार्यकारी अभियंता पराते हे नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यावेळी पराते यांनी उपकार्यकारी अभियंता रामदास भगत यांच्या विरूद्ध दोन विभागीय चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना विभागाचा कार्यभार सोपविणे योग्य नाही, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिले होते. असे पत्र देणारे पराते यांनी सहा महिन्यातच भगत यांच्याकडे कार्यकारी अभियंतापदाचा प्रभार सोपविला. त्यामुळे चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच भगत हे आता कसे कार्यक्षम झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरावती, गडचिरोलीत अपहाराचा ठपका
भंडारा जिल्हा परिषदमध्ये बदली होण्यापूर्वी रामदास भगत हे अमरावती जिल्ह्यातील तिवसा उपविभागात कार्यरत होते. तेथून त्यांची बदली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात झाली. तिवसा व अहेरी येथील त्यांचा कार्यभार वादग्रस्त ठरला. या दोन्ही ठिकाणी त्यांनी अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याने दोन्ही प्रकरणाची मंत्रालयातून चौकशी लावली आहे. अधीक्षक अभियंता या दोन्ही प्रकरणाची चौकशी करीत आहेत, हे विशेष.