शोकाकूल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:58+5:302021-01-13T05:32:58+5:30
भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूरजवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. भोजापूर गावातील सोनझारी ही ...
भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूरजवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला. अग्नितांडवात दगावलेली बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी. त्यामुळे तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती.
अशीच परिस्थिती सीतेकसा येथील कविता बारेलाल कुमरे या मातेची. तीही मोलमजुरी करून स्वतःचा निर्वाह करते. गेल्या महिन्यात ७ तारखेला तिच्या संसारवेलीवर पहिलेवहिले पुष्प उमलले. मात्र या मुलीचे वजन कमी असल्याने तिला उपचारासाठी भंडारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचीही प्रकृती सुधारली होती आणि लवकरच तिला डिस्चार्ज मिळणार होता. मात्र काल पहाटे आलेल्या त्या दुर्दैवी निरोपाने सर्वस्व हिरावले गेल्याची अत्यंत दुःखद जाणीव या दोघींना झाली. त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या घटनेमुळे अत्यंत व्यथित झालेले मुख्यमंत्री रविवारी तातडीने भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून काही क्षण ते निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
बाॅक्स
मुख्यमंत्र्यांची विनम्र सहृदयता
दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दात सहवेदना व्यक्त करतानाच यापुढे अशी घटना घडणार नाही असे वचनच जणू मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही मातांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली ही विनम्र सहृदयता पाहून दोघींचे कुटुंबीय सद्गदित झाले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले , जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब आदी यावेळी उपस्थित होते. या भेटीच्या निमित्ताने विदर्भातील सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणारी मुख्यमंत्र्यांची भावनिकताही अनुभवली.