मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:52+5:302021-06-16T04:46:52+5:30
गोंदिया : कोराेनामुक्त गाव करण्याचा ध्यास उराशी बाळगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील २ सरपंचांशी ...
गोंदिया : कोराेनामुक्त गाव करण्याचा ध्यास उराशी बाळगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील २ सरपंचांशी थेट संवाद साधला. कोरोना नियंत्रण, उपाययोजना तथा संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत घेण्यात येणाऱ्या दक्षतेची सरपंचांनी याप्रसंगी माहिती दिली. जिल्ह्यातील कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घेण्याचे याप्रसंगी आवाहन केले.
शासनातर्फे ‘कोरोनामुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ग्राम करंजी आणि तिरोडा तालुक्यातील ग्राम कुलपा या आदिवासीबहुल गावांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी निवड करण्यात आली. करंजीचे सरपंच हंसराज चुटे तर कुलपाचे सरपंच नाशिक धुर्वे हे या चर्चेत सहभागी झाले हाेते. सरपंचांनी गावातील लोकसंख्या व विविधतेसह कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर गावातील मजुरांचे बाहेरून परतणे सुरू झाले. त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले व त्यानंतरच घरात प्रवेश देण्यात आला. गावात स्वच्छता, वेळोवेळी निर्जंतुकीकरण, शारीरिक अंतर पाळणे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुण्याबाबत गावात मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी गावातील मंदिरातील साऊंड सिस्टिमचा प्रभावी वापर करण्यात आल्याचे सांगितले.
कोविड नियंत्रणासाठी वॉर्ड व दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. याशिवाय लसीकरण, विलगीकरण व मदत कार्य तथा आदिवासी खावटी समितीची देखील स्थापना करण्यात आली. गावस्तरावर जनजागृतीसाठी गावस्तरीय कर्मचारी, पदाधिकारी, नवयुवकांचे सामाजिक माध्यमांवर ग्रुप तयार करण्यात आले. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लक्षणे असलेल्या गावकऱ्यांची कोविड चाचणी करून वेळीच तपासणी मोहीमसुद्धा राबविण्यात आली. सुदैवाने दोन्ही गावात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. संभाव्य तिसरी लाट थोपवून लावण्याची तयारीसुद्धा गावाने केली आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करून आतापर्यंत ८६ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करण्यात आल्याचे सरपंचांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. तिसरी लाट थोपविण्यासाठी गावस्तरावर आम्ही तयार असल्याचे सांगून गावात शंभर टक्के लसीकरणाची ग्वाहीसुद्धा याप्रसंगी सरपंचांनी दिली.
गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, आमगावचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, तिरोडाचे गटविकास अधिकारी एस. एम. लिल्हारे तथा तालुक्यातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले.
गावभर भुईनिम आणि गूळवेलचा काढा
कुलपा हे अनुसूचित जातीबहुल गाव आहे. गावाला लागूनच नागझिरा अभयारण्य आहे. गावाला तसे नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सोबतच जंगलातील औषधी वनस्पतीसुद्धा गावकऱ्यांना सहज उपलब्ध होतात. कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी भुईनिम आणि गूळवेलचा काढा घेण्यास सुरुवात केली. आजाराबाबत जनजागृती, जंगलातील औषधी वनस्पतींचा वापर, वेळीच कोरोना तपासणीच्या विविधांगी उपक्रमांमुळे आतापर्यंत गावातील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही, हे विशेष.
दररोज ६ हजार व्यक्तींचे लसीकरण
काेरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्या मार्गदर्शनात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह लसीकरण व चाचणीवर विशेष भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात दररोज साधारणतः साडेचार हजार व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, नरेगाचे कामांवर जाऊन कोरोना चाचणी केली जाते. जिल्ह्यात लसीकरण केंद्रे वाढविण्यात येत असून, १४० विविध केंद्रांतून सध्या लसीकरण सुरू आहे. प्रतिदिन सुमारे ६ हजार व्यक्तींचे लसीकरण करून आतापर्यंत ३ लाखांवर लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून लसीकरण, तपासणीबाबत नियमित आढावा घेण्यात येतो. लसीकरणाच्या या मोहिमेत शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.