मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:22 PM2017-08-27T22:22:37+5:302017-08-27T22:23:16+5:30

सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे.

Chief Minister - Minister of State of Pavanachari, Lord Ganapati | मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

मुख्यमंत्री - राज्यमंत्री पवनारखारीच्या गणपतीचे भक्त

Next
ठळक मुद्देश्रद्धाळू घेतात दर्शन : महाराष्ट्राच्या दोन तर मध्यप्रदेशातील एका मुख्यमंत्र्यांनी दिली होती भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी येथे सन १९३४ पासून गणपती उत्सव स्वयंचलित चित्ररथ साकार करून साजरा केला जात आहे. यावर्षी रामजन्माची चित्ररथ तयार करण्यात आले आहे. ब्रिटीशकाळात या गणेशोत्सवाची सुरुवात गोयनका कुटुंबाने केली होती. पूर्व विदर्भ, छत्तीसगड व मध्यप्रदेशातील हजारो भक्त येथे दरवर्षी येतात. येथील गणेश दर्शनाकरिता तत्कालीन मुख्यमंत्री, राज्यपाल यांनी भेटी दिल्या आहेत. पवनारखारीत दहा दिवस यात्राही भरते हे विशेष. येथील गणपतीला महाराष्ट्राचे दोन तर मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री व राज्यपालांनी भेट दिली होती.
तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वत रांगात पवनारखारी हे आदिवासी बहुल गाव आहे. तुमसर पासून १८कि.मी. अंतरावर हे गाव असून एस.टी. व रेल्वेने या गावला भेट देता येते. व्यवसायीक गोयनका कुटुंबानी सन १९३४ पासून गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा तथा छत्तीसगड व जवळच्या मध्यप्रदेशातील हजारो भाविक येथे दर्शनाला दरवर्षी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. या गणपतीची वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षी येथे स्वयंचलित चित्ररथ तयार केले जातात. जे सर्वांचे आकर्षण केंद्र ठरते. दरवर्षी येथे सुमारे तीन लाख भाविक येथे दर्शनाला येतात. येथे मोठी यात्राही भरते. १९६४ मध्ये पवनारखारीला आदर्श गावाचा पुरस्कार मिळाला होता.
पौराणिक प्रसंगावर आधारित येथील स्वयंचलीत चित्ररथ तयार केले जातात. पूर्वी येथे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली जात होत्या. येथील गणपतीची चर्चा एकेकाळी मुंबई, भोपाळपर्यंत होती.
पवनारखारी येथील गणपती दर्शनाला तत्कालीन मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री पं.रविशंकर शुक्ला, राज्यपाल पट्टाभीसीतारामय्या, यशवंतराव चव्हाण व दादासाहेब कन्नमवार यांनी भेटी दिल्या होत्या.
यावर्षी भगवान श्रीराम जन्म तथा त्यांचे बालपणांचे चित्ररथ तयार केले आहे. गोयनका कुटुंबातील वयोवृद्ध ८४ वर्षीय महाविरप्रसाद गोयनका लहानपणापासून चित्ररथाचे निर्माण करीत आहेत.
पवनारखारी येथील गणपती दर्शनाकरिता गोबरवाही, सीतासावंगी, चिखला, नाकाडोंगरी, डोंगरी बु., बघेडा परिसरातील प्रत्येक घरी नातेवाईकांचे रेलचेल असते. दहा दिवस येथे विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाचे भक्त मोठ्या श्रद्धेने येथे येऊन गणरायाकडे विनवणी करतात.

Web Title: Chief Minister - Minister of State of Pavanachari, Lord Ganapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.