मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गोसेखुर्द प्रकल्पावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:07+5:302021-01-08T05:56:07+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी १०.१५ वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन होईल. त्यानंतर हेलिकाॅप्टरने पवनी तालुक्यातील गोसेखुर्दकडे प्रयाण ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी १०.१५ वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने आगमन होईल. त्यानंतर हेलिकाॅप्टरने पवनी तालुक्यातील गोसेखुर्दकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता प्रकल्पालगत असलेल्या राजीव टेकडी येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतरची वेळ राखीव राहणार आहे. दुपारी १.१५ वाजता ब्रम्हपुरी तालुक्यातील खेडमडकाकडे प्रयाण करतील. भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच येत असून महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला भेट देत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पाला तीन दशके पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. या प्रकल्पाची किंमत २० हजार कोटींवर पोहचली आहे. निधी अपुरा असल्याचे कारण पुढे करून डावा व उजवा कालव्याचे काम टेलपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. उजवा कालवा अपूर्ण ठेवून पाणी आसोलामेंढा जलाशयापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. तेही यशस्वी झाले नाहीत. अद्यापही काही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. बाधित गावांतील नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. वक्रद्वारातून पडणारे पाणी पर्यटकांना आकर्षित करू शकते. आता मुख्यमंत्री येत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.