नियोजित स्थळीच होणार मुख्यमंत्र्यांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:39 AM2018-02-02T00:39:30+5:302018-02-02T00:39:48+5:30
तुमसर नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न डॉ.पंकज कारेमोरे यांचा होता. त्यामुळेच त्यांनी सदर जागेवर झाडे लावली होती. नगर पालिकेने ती झाडे अन्यत्र हलवून तिथे संरक्षकभिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : तुमसर नगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न डॉ.पंकज कारेमोरे यांचा होता. त्यामुळेच त्यांनी सदर जागेवर झाडे लावली होती. नगर पालिकेने ती झाडे अन्यत्र हलवून तिथे संरक्षकभिंत बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे ४ फेबु्रवारी रोजी होणारी मुख्यमंत्र्यांची सभा नियोेजितस्थळीच होईल, अशी स्पष्टोक्ती आमदार चरण वाघमारे यांनी पत्रपरिषदेत केली.
बुधवारला दुपारी माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचे पुत्र डॉ.पंकज कारेमोरे यांनी आ.चरण वाघमारे, नगरसेवक श्याम धुर्वे यांना धक्काबुक्की करीत नगर पालिकेच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीस तक्रारही करण्यात आली. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, तुमसर नगर परिषेदच्या स्थापनेला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. नगर परिषदेचा शतकोत्तर महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या कार्यक्रमासाठी ४ फेबु्रवारी रोजी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमसरात येत आहेत. संताजी सभागृहाजवळील मैदानावर त्यांची सभा होणार आहे. त्या जागेची पाहणी करण्यासाठी आम्ही गेलो असता त्याठिकाणी डॉ.पंकज कारेमोरे यांनी शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्या जागेवर मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे ती जागा चकोले नामक व्यक्तीने नगरपरिषदेला दान दिली आहे. काही वर्षापूर्वी ही जागा लिजवर देण्यात आली होती. आता ती लिज रद्द केल्यानंतर नगर पालिकेने जागा आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे त्या जागेवर तुमसर नगर पालिकेची मालकी आहे. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सुनील मेंढे, प्रा.उल्हास फडके उपस्थित होते.