बालहक्क संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 06:35 AM2021-01-14T06:35:12+5:302021-01-14T06:35:20+5:30
वेळेत कृती अहवाल सादर न केल्याबाबत द्यावे लागणार स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा निष्पाप तान्हुल्यांचा बळी घेणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निकांड प्रकरणात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने कारवाईचा कृती अहवाल दिलेल्या मुदतीत सादर न केल्यामुळे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना ‘समन्स’ बजावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना १८ जानेवारीला आयोगासमक्ष ‘ऑनलाइन’ उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागेल. या प्रकरणी अद्याप एकही गुन्हा दाखल न झाल्याने हलगर्जीबाबत संताप व्यक्त होत आहे, हे विशेष.
रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्याचदिवशी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, त्याचा कृती अहवाल सादर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातील कृती अहवाल आयोगाला मिळाला नाही. त्यामुळे आयोगाने भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘समन्स’ बजावले आहे.
माझ्यापर्यंत ‘समन्स’ आले नाही : जिल्हाधिकारी
यासंदर्भात जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडून मला कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा ‘समन्स’ आलेले नाही, असे स्पष्ट केले. माझ्या माहितीनुसार अशाप्रकारची नोटीस असेल तर ती अगोदर शासनाला येईल. त्यानंतर ती माझ्यापर्यंत येईल, असेदेखील सांगितले.
दुर्घटनेबाबत समितीचा अहवाल रविवारी येणार
मुंबई : विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती याची चौकशी करीत आहे. ही समिती येत्या रविवारी अहवाल सादर करेल, असे आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कॅबिनेटच्या बैठकीत सांगितले.
तर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुरक्षाविषयक ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन यंत्रणा व विद्युत विभागांनाही रुग्णालयांतील वीज व अग्निशमन यंत्रणांच्या तपासणीच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंट
अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे. ना फायर ऑडिट, ना फायर हायड्रंट, अशीच अवस्था दिसत आहे.
राज्यपालांकडून पालकांना प्रत्येकी २ लाख
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आगीत १० बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तातडीने करा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी दिले. अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना स्वेच्छा निधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत त्यांनी जाहीर केली.
जिल्हा रुग्णालयात शनिवारी पहाटे घडलेल्या अग्निकांड दुर्घटनेच्या घटनास्थळाची कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी पाहणी केली व बाल अतिदक्षता कक्षातील शिशूंच्या मातांसोबत संवाद साधला. एसएनसीयूमधील आगीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि यानंतर मृत बालकांच्या कुटुंबीयांना दिलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली. तत्पूर्वी विश्रामगृहावर विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदने दिली.