अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव लग्नमंडपातच उधळला; बालसंरक्षण समितीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 03:03 PM2022-05-05T15:03:00+5:302022-05-05T15:15:48+5:30

भंडारा येथील एका मंगल कार्यालयात हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली.

child welfare committee stopped the marriage of a minor girl in bhandara | अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव लग्नमंडपातच उधळला; बालसंरक्षण समितीची कारवाई

अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव लग्नमंडपातच उधळला; बालसंरक्षण समितीची कारवाई

Next

भंडारा : वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला. लग्नाची घटिकाही अगदी जवळ आली. सर्व तयारी झाली असताना अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे पथक पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचले. नवरी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर करीत लग्नाचा डाव मोडला.

ही कारवाई भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या मंडळींनी लेखी दिले. मात्र लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडींना आल्यापावली परत जावे लागले.

भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी १०.४० वाजता लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. एक पथक साई मंगल कार्यालयात पोहोचले. तेथील हालचालींवर लक्ष ठेवून होते. दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले. तर तिसरे पथक भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचे पथक घेऊन आले.

सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव वधूमंडपी पोहोचला. लग्न लागण्याची तयारी सुरू झाली. परंतु जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत होता. शेवटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवरीचे आई-वडील व नातेवाइकांची भेट घेतली. त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु त्यांनी मुलीची जन्मतारीख १५ एप्रिल २००४ असल्याचे सांगत मुलगी १८ वर्षांची आहे, असे ठणकावून सांगितले.

शाळेचा दाखला देण्यास विलंब होत असल्याने पथकाने भंडारा नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला. त्यावर १५ एप्रिल २००५ असे नमूद होते. नवरी मुलगी १७ वर्षे १९ दिवसांची असल्याची आढळून आली आणि लग्नाचा डाव मोडला.

नवरी-नवरदेव बालकल्याण समितीपुढे हजर

नवरी अल्पवयीन असल्याने लग्न थांबविण्यात आले. अल्पवयीन नवरी आणि नवरदेवाला भंडारा येथील बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले. त्या समितीसमक्ष वधू-वर तसेच दोन्ही पक्षांतील नातेवाइकांनी कायद्याचे पालन करीत १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असे समितीला सांगितले. तसेच वर आणि वधू राहत असलेल्या क्षेत्रातील विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Web Title: child welfare committee stopped the marriage of a minor girl in bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.