पहिली ते चौथीची मुले घरात कंटाळली : त्यांना हवी शाळा, पालकांची ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:50+5:302021-02-13T04:34:50+5:30
भंडारा : कोरोना संकटामुळे गत आठ महिन्यांपासून राज्यभरातील शाळा बंद होत्या, मात्र टप्प्याटप्प्याने पहिले ९ ते १२वी व त्यानंतर ...
भंडारा : कोरोना संकटामुळे गत आठ महिन्यांपासून राज्यभरातील शाळा बंद होत्या, मात्र टप्प्याटप्प्याने पहिले ९ ते १२वी व त्यानंतर पाचवी ते आठवी इयत्ता वर्ग भरणे सुरू झाले आहे. मात्र पहिली ते चौथीचे विद्यार्थी यांची शाळा अजूनही सुरू झाली नाही. परिणामी या इयत्तेतील विद्यार्थी घरात राहून कंटाळली असून त्यांना आता शाळेत जायची घाईगर्दी झाली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने पालकांकडून ना, असे उत्तर येत आहे.
भंडारा जिल्ह्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या ५१६ शाळा असून त्यामध्ये २० हजार ५१९ विद्यार्थी तर शिक्षकांची संख्या ३०१ आहे. विद्यार्थी म्हणतात, शाळा सुरू झाल्या पाहिजे तर पालकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे
बॉक्स
मुलांना हवी शाळा
माझ्या शेजारचा मोठा भाऊ आणि ताई शाळेत जातात. परंतु मी केव्हा शाळेत जाणार? असा प्रश्न मी रोजच आई-वडिलांना विचारत असते.
सेजल गोन्नाडे, पहिलीची विद्यार्थिनी.
बॉक्स
केव्हा केव्हा शाळा सुरू होते, असं वाटत आहे. घरात राहून कंटाळवाणे वाटत असल्याने पप्पांना रोज मी केव्हा शाळेत जाणार, असा प्रश्न विचारीत असते.
चार्वी भगत, दुसरीची विद्यार्थिनी.
बॉक्स
शेजारचे विद्यार्थी शाळेत जात असताना मलाही शाळेत जाण्याची इच्छा होत आहे. मात्र शाळा आमची सुरू झाली नाही असे सांगण्यात येते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याचे मला माहीत आहे.
काव्य नंदेश्वर, तिसरीचा विद्यार्थी.
बॉक्स
जानेवारी महिन्यात शाळा सुरू होईल असे वाटत होते मात्र आता फक्त मोठे दादा आणि ताई त्या शाळेत जाऊ लागले आहेत. आता आम्हालाही शाळेत जाऊ द्यावे असे झाले आहे.
दुर्वेश मसराम, चवथीचा विद्यार्थी.
बॉक्स
पालकांना चिंता
पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या मात्र कोरोनाचे संकट कायम आहे. अशा स्थितीत या चिमुकल्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे?
महेश भगत, पालक भंडारा.
बॉक्स
शाळा सुरू करायला हरकत नाही. मात्र कोरोना संसर्गाची भीती या चिमुकल्यांच्या मनात नसावी. किमान पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी.
विलास मडामे, पालक भंडारा.
बॉक्स
शाळा सत्र बंद व्हायला काही महिने शिल्लक आहे. अशा कोरोना संसर्ग काळात या लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे थोडे चुकीचे वाटते. योग्य निर्णय घ्यायला हवा.
सागर मेश्राम, पालक भंडारा.
बॉक्स
कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णतः संपलेला नाही. अशा स्थितीत पालकांना विद्यार्थी सुरक्षित असावा असे वाटते. त्यामुळे विचार करूनच निर्णय घेण्यात यावा.
दीपक गिरेपुंजे, पालक खरबी