कोरोनातून सावरलेल्या बालकांना ‘एमएसआयसी’ आजाराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:24 AM2021-06-26T04:24:53+5:302021-06-26T04:24:53+5:30
भंडारा : कोरोनानंतर विविध आजार डोके वर काढत आहेत. अशातच ‘एमएसआयसी’ म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा बालकांमध्ये धोका बळावण्याची ...
भंडारा : कोरोनानंतर विविध आजार डोके वर काढत आहेत. अशातच ‘एमएसआयसी’ म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा बालकांमध्ये धोका बळावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना झालेल्या बालकांना पंधरा दिवस ते तीन महिन्यांच्या कालावधीत हा आजार उद्भवू शकतो. प्राथमिक लक्षणे ओळखून औषधोपचार केल्यास त्यावर सहजपणे मात करता येऊ शकते.
जिल्ह्यात आतापर्यंत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३४१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. एमएसआयसी आजार वय वर्ष ३ ते १२ या गटात होऊ शकतो. २४ तासांपेक्षा जास्तवेळ अंगात ताप असणे, बाळाला सुस्त वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, डोळे लाल होणे, उलटी, मळमळ व हगवण लागणे, हृदयाची गती वाढणे, श्वसन प्रक्रिया वेगात होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांना दाखवून देणे अत्यंत आवश्यक आहे. दिरंगाई करणे म्हणजे बाळाला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. याशिवाय आपल्या मनाने बाळाला औषध देऊ नये.
बॉक्स
जिल्ह्यात ६५१ बालकांना कोरोना
जिल्ह्यात आतापर्यंत ० ते १० वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर बालके बरी होऊन घरी परतली.
बॉक्स
ही घ्या काळजी
२४ तासांपेक्षा जास्त ताप असणे, शरीर अस्वस्थ वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, उलटी होणे, डोळे लाल होणे, हगवण, हृदयाची गती वाढणे अशी लक्षणे आढळतात. यावर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक लक्षणे आढळली तरी स्वमताने बालकाला औषध देऊ नये. वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या बालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो बरा झाला असेल तर त्यावर लक्ष देत राहावे. घाबरण्याचे कारण नाही. परंतु दक्ष असणे महत्त्वाचे आहे.
कोट बॉक्स
बालकाला कोरोना झाल्यानंतर पंधरा ते तीन महिन्यांपर्यंत एमएसआयसीचा धोका असू शकतो. घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. प्राथमिक लक्षणे लक्षात येताच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उगीच जोखीम पत्करण्यापेक्षा उपचार करणे कधीही चांगले असते.
डॉ. अमित कावळे, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.