भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

By admin | Published: January 30, 2017 01:47 AM2017-01-30T01:47:13+5:302017-01-30T01:47:13+5:30

भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले

Children of wandering must be taught! | भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

भटक्यांची मुले शिकली पाहिजे!

Next

भिकुजी इदाते : भिलेवाडा येथे भटके -विमुक्त विकास परिषद, २,९०० भटक्या कुटुंबीयांची नोंद
भंडारा : भटक्या समाजात अज्ञान आणि अज्ञानामुळे अंधश्रध्दा सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी भटक्यांची मुले शिकली पाहिजेत जगाचे ज्ञान शिक्षणाशिवाय कळणार नाही, असे मत भटके विमुक्त आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकुजी (दादा) इदाते यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय भटके-विमुक्त विकास परिषदेचे भिलेवाडा येथे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.
बिऱ्हाड परिषदेचे अध्यक्ष उकांडा वडस्कर, उपाध्यक्ष शिवा कांबळी, संयोजक दिलीप चित्रीवेकर, प्रवीण जगताप, प्रकाश शेंडे, नत्थुजी बिसने, अंकोश तांदुळकर, वासुदेव सुतार बहुरुपी, व्यंकट ठाकरे वडार, शिवाजी गायकवाड कैकाळी, शामराव शिवणकर गोपाळ, राजू शेंडे होली, चैनसिंग कतारी, दीपक अंकुशे ओतारी, गोपीचंद शिवणकर पांगूळ, इंदल नारनवरे पारधी राजकुमार दोनोडे आदी उपस्थित होते.
भिकु इदाते म्हणाले, भटक्या समाजासमोर शिक्षणाचा, आरोग्याचा, घरादाराचा, रोजगाराचा असे अनेक प्रश्न आहेत. भटके-विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते अनेक मोर्चे, आंदोलन करुन हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात, आता मात्र हे प्रश्न मोर्चे, आंदोलनाने सोडविण्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर भर देवून सोडविण्यासाठी पालकांनी व कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा. भटक्यांची मुले जोपर्यंत शिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना सरकारच्या योजना करळणार नाही. भटक्यांच्या संघर्षाचा लढा कायम सुरु राहिल. भटक्यांची सव्वाकोटी लोकसंख्या असूनही त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही. बार्टीच्या धरतीवर भटक्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही यावेळी इदाते यांनी सांगितले. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बिऱ्हाडासह महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, वाशिम, मेहकर, वर्धा या जिल्ह्यातील भटक्या समाजांची १४०० बिऱ्हाड भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावात मिळेल त्या साधनाने पोहचले होते. नागजोथी, बहुरुपी, ओतारी, कतारी, बेलदार, पांगूळ, वडाळ, गिरी, पारधी, गोपाळ, सोंजारी, मांगगारुडी, गोंधळी, मसनजोगी, कैकाळी, जोशी, होली, बैगागोंड आदी भटक्या समुदायातील लोक या परिषदेत सहभागी झाले होते.
भटक्या विमुक्तांच्या जीवनात विकासरुपी सुर्याचा प्रकाश पोहचावा, त्यासाठी समाज, संघटना आणि शासन यांच्यात समन्वय साधला जावा या हेतुने परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून दोन दिवसीय बिऱ्हाड परिषदेचे उद्घाटन काल झाले. उद्घाटन आमदार परिणय फुके व प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांच्या हस्ते करण्यात आले. इदाते यांच्या हस्ते या बिऱ्हाड परिषदेचे समारोप करण्यात आले. याशिवाय शोभायात्रा, मुक्त चिंतन, गटचर्चा आणि समारोप कार्यक्रम पार पडला. रात्रीला भटकी लोककला सादर करण्यात आली. यामध्ये गोपाळाचा खेळ, बहूरुपींचे वेशभूषा, नागजोथींचे किंद्रीवादन, पांगुळाचे दानपावले, गरमगठ्टा आदी कलांचा समावेश होता.
२०१० मध्ये कारधा येथे पहिली बिऱ्हाड परिषद झाली होती. २०१२ मध्ये चारभट्टी (लाखांदूर)तर तिसरी बिऱ्हाड परिषद २०१४ मध्ये साकोली येथे झाली होती. या दोन दिवसीय परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे ध्वजारोहण, भटक्या लोककलांचे प्रदर्शन, शासकीय योजनांची माहिती, शोभायात्रा, प्रदर्शनी, भटकी बाजार, रोगनिदान शिबिर, जातप्रमाणपत्र वाटप, शासकीय अधिकाऱ्यांसोबत संवाद असे या बिऱ्हाड परिषदेचे स्वरुप होते.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २,९०० भटके कुटूंबियांची नोंद घेण्यात आली आहे. याप्रसंगी भटक्या विमुक्तांच्या विविध समस्या व मागण्यांसंबधी चर्चा करण्यात आली. भटकी समाजाला जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, यशवंतराव चव्हाण भटकी वसाहत योजना सुरु करण्याबाबद, वनजमीन अतिक्रमण पट्टा वाटप करण्याबाबद, भटक्या जमातीतील महिलांना कुटीर उद्योग शासनातर्फे कर्ज देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Web Title: Children of wandering must be taught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.