बालोद्यानातील खेळणी उरली नावापुरतीच
By admin | Published: May 25, 2015 12:40 AM2015-05-25T00:40:57+5:302015-05-25T00:40:57+5:30
उद्यान म्हणजे सुंदर गार्डन, लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, घसरगुंडी, आदी खेळण्यांचे साहित्य, असा सर्वसामान्य ..
हिरवेगार उद्यान बनले भकास : घसरगुंडी, पाळणे सारेच बिनबुडाचे
भंडारा : उद्यान म्हणजे सुंदर गार्डन, लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, घसरगुंडी, आदी खेळण्यांचे साहित्य, असा सर्वसामान्य समज. शहरातील बहुतांश उद्यानात हे सर्वच आहे. परंतु त्याची अवस्था मात्र भयावह आहे. बालोद्यानातील खेळणी केवळ तुटलेलीच नाहीत, तर ती मुलांसाठी जीवघेणी सुद्धा बनली आहेत. अशा परिस्थितीतही मुलांना नाइलाजास्तव खेळावे लागत आहे, ही शोकांतिका आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील चाचा नेहरू बालोद्यानाची.
शहरातील नागरिकांसह बालकांच्या मनोरंजनासाठी वॉर्डांमध्ये बगीचा तयार करण्यात यावे, असा शासनाचा निर्णय असून, त्याचे बांधकाम आणि सौंदर्यीकरणासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला जातो. आदेशाप्रमाणे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील चाचा नेहरू बालोद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी दलित वस्ती योजनेतंर्गत लाखो रूपये खर्च करण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सौंदर्यीकरणाची कामे खोळंबली आहेत. तेथे भरपूर समस्या असून बालकांसाठी असलेली झुकझुक गाडी एकाच ठिकाणी थांबलेली आहे. तसेच हिरवळही फक्त नावारूपालाच येथे पाहायला मिळते. (नगर प्रतिनिधी)
सर्वांचेच दुर्लक्ष
कॅन्टीन, तिकीटघराची कामे अपूर्ण आहेत. तेथे बालकांसाठी पाण्याचे कारंजे आणि विविध खेळणी धूळखात आहेत. बालोद्यानात अस्वच्छता दिसून येते. बालोद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर कचराच कचरा साचलेला आहे. कचरा पेटी असली तरी ती कचऱ्याने तुंबलेली असते. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष आहे.