पतंगाच्या नायलॉन मांजाने गळा चिरला; बालक गंभीर, लाखांदूर येथील घटना
By ज्ञानेश्वर मुंदे | Published: January 26, 2023 10:36 PM2023-01-26T22:36:53+5:302023-01-26T22:37:22+5:30
सायंकाळी रूद्रा आपल्या वडिलांसोबत दुचाकीने घरी गेला. घरी वडिलांना पाणीपुरी खायला जातो असे सांगून चौकात आला.
लाखांदूर(भंडारा) : दुचाकीने घराकडे परतणाऱ्या एका १६ वर्षीय बालकाचा गळा नायलॉन मांजा चिरल्याची घटना लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास रुद्रा तुळशीदास तोंडरे (१६) रा. लाखांदूर असे जखमीचे नाव आहे.
सायंकाळी रूद्रा आपल्या वडिलांसोबत दुचाकीने घरी गेला. घरी वडिलांना पाणीपुरी खायला जातो असे सांगून चौकात आला. चौकातून दुचाकीने घराकडे परत जात असताना तुटलेल्या पतंगीचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यावर आला. गळ्यावर काहीतरी असल्याचे जाणवतात रुद्राने आपली दुचाकी थांबविली मात्र नायलॉन मांजा पकडलेल्या अन्य एकाने तुटलेली पतंग मिळण्यासाठी नायलॉन मांजा ओढला. यात रुद्राच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. रुद्राच्या गळा जवळपास ७ सेंटीमीटर कापला गेला. ही घटना वनविभागाचे कर्मचारी एस जी खंडागळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ रुद्राला उपचारासाठी लाखांदूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
रुद्रावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. मकरसंक्रांत संपून जवळपास आठवडा लोटला असताना देखील स्थानिक लाखांदुरात नायलॉन मांजाची विक्री अजूनही जोमात सुरू आहे. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे.