चिमुकल्यांची शाळेत बैलबंडीतून एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:23 PM2019-06-26T23:23:37+5:302019-06-26T23:23:59+5:30

शाळेचा पहिला दिवस म्हणजे धाकधुकीचा. नवीन शाळा, नवीन शिक्षक असे वातावरण. चिमुकले विद्यार्थी आणि पालकांच्याही चेहऱ्यावर तणाव असतो. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांची बैलबंडीतून वाजत गाजत एन्ट्री झाली. शाळेच्या परिसरात टेडीबीअरचा वेषपरिधान केलेल्या व्यक्तीने चिमुकल्यांशी हस्तांदोलन केले. मनावर असलेला ताण काही क्षणात निघून गेला. नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी असे आगळेवेगळे स्वागत तुमसर येथील जनता विद्यालयात करण्यात आले.

Child's School entry | चिमुकल्यांची शाळेत बैलबंडीतून एन्ट्री

चिमुकल्यांची शाळेत बैलबंडीतून एन्ट्री

Next
ठळक मुद्देविद्यार्थी व पालक भारावले : गाडीवानाला फेटा अन् बैलाना रंगीत झुली, शाळेचा पहिला दिवस उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शाळेचा पहिला दिवस म्हणजे धाकधुकीचा. नवीन शाळा, नवीन शिक्षक असे वातावरण. चिमुकले विद्यार्थी आणि पालकांच्याही चेहऱ्यावर तणाव असतो. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांची बैलबंडीतून वाजत गाजत एन्ट्री झाली. शाळेच्या परिसरात टेडीबीअरचा वेषपरिधान केलेल्या व्यक्तीने चिमुकल्यांशी हस्तांदोलन केले. मनावर असलेला ताण काही क्षणात निघून गेला. नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी असे आगळेवेगळे स्वागत तुमसर येथील जनता विद्यालयात करण्यात आले.
शाळेची पहिला घंटा बुधवार २६ जूनला वाजली. प्रत्येक शाळेने शाळा प्रवेशाचा उत्सव साजरा करावा, असे शिक्षण विभागाने निर्देश दिले. प्रत्येक शाळेने आगळ्यावेगळ्या पध्दतीने शाळा प्रवेश साजरा केला.मात्र तुमसर येथील जनता विद्यालयाचा शाळा प्रवेश संपूर्ण जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रंगीत झुरी पांघरलेले बैल आणि फेटे घातलेला गाडीवान अशा सजविलेल्या बैलबंडीत चिमुकले शाळेत आले. समोर वाद्यांचा गजर होत होता. जनता विद्यालयही नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. जुन्या काळात वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बैलबंडीतून चिमुकले शाळेत जात असतानाचे दृष्य पाहून शहरातील नागरिकांच्या नजरा वेधल्या. चौकाचौकात टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. भिरभिरत्या नजरेने विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात उतरले तो टेडीबीअरचा वेष परिधार केलेला व्यक्ती पुढे आला. त्याने विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहºयावरील आनंद गगणात मावेनाशा झाला.
प्रत्येक नवागत विद्यार्थ्याचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, प्राचार्य हेमंत मेळवदे, प्राध्यापक पंकज बोरकर, उपप्राचार्य एस.एन. लांजे, पर्यवेक्षक सुनील नासरे, एस. डब्ल्यू. भालेकर उपस्थित होते. या चिमुकल्यांना मिठाई देण्यात आली.
शाळा प्रवेशोत्सव
विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण द्यावे या उद्देशाने शाळा प्रवेशाचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या ठोक्याला विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या शाळांमध्ये स्वागत करण्यात आल्या. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन मित्र अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी हसत खेळत शाळेत प्रवेश केला.

Web Title: Child's School entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.