चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:37+5:302021-02-05T08:38:37+5:30
भंडारा : शासनाच्या आदेशानुसार बुधवारी तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पुनरागमन झाले असून, शाळेत आता ...
भंडारा : शासनाच्या आदेशानुसार बुधवारी तब्बल दहा महिन्यांच्या कालावधीनंतर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पुनरागमन झाले असून, शाळेत आता किलबिलाट सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत रांगोळी काढून तसेच फुले देऊन स्वागत केले. भंडारा शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी सुरक्षित अंतर पाळून बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक आर. एस. बारई यांनी दिली. दहा महिन्यांनंतर शाळा उघडणार असल्याने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. अनेक पालकांच्या मनामध्ये धास्ती असली तरी विद्यार्थीही घरी कंटाळले असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. बुधवार, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने गेल्या आठवडाभरापासून या वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण सुरू केले. यापूर्वीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देत असतानाच त्यांचे थर्मल स्कॅनिंग करून त्यांचे तापमान मोजूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच करोनाबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती मुख्याध्यापक आर. एस. बारई यांनी दिली. यावेळी क्रीडा शिक्षक प्रशांत घाटबांदे व मीरा कुकडकर यांनी विद्यार्थ्यांचे तापमान मोजून त्यांना कोरोनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यवेक्षक डी. पी. राठी व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांची मधली सुटी टाळून तसेच विद्यार्थी एकत्र येणार नाहीत, अशी काळजी घेतली जात आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना घरातून येतानाच स्वतःची पाण्याची बाटली घेऊन येण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. भंडारा शहरात विद्यार्थ्यांचे रांगोळी काढून व गुलाब पुष्प देऊन स्वागत केल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरीही अद्याप अनेक शाळांमध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोट
कोरोना संसर्गाची सर्व खबरदारी घेऊन तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वाराजवळच थर्मल स्कॅनिंग करून, एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था केली. पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनीच शासनाच्या नियमांचे पालन करावे.
आर.एस. बारई, नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडारा
चिमुकल्यांचा आनंद शिगेला
गेल्या दहा महिन्यांपासून चिमुकले शाळेत परतले नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येताच आनंदाने एकमेकांशी भरभरून गप्पा मारत होते. यासोबतच आलेल्या पालकांनीही आपल्या पाल्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाला पारावार उरला नसल्याचे देवेंद्र बाभरे यांनी सांगितले.